स्वातंत्र्य, समता आणि मानवतेसाठी निनादणारा आवाज काळाच्या पडद्याआड....

Update: 2021-10-30 08:41 GMT

राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, स्वातंत्र्य शाहीर लीलाधर हेगडे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्य चळवळ, साने गुरुजींचा पंढरपूर सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्र सेवा दलाचं कलापथक यातील त्यांचं योगदान मोठं होतं. महाराष्ट्र दर्शन व शिव दर्शनाने त्यांची देशभर ख्याती झाली. स्वातंत्र्य, समता आणि मानवता या मूल्यांसाठी निनादणारा लीलाधर हेगडे यांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मुंबईत सांताक्रूझच्या झोपडपट्टीत साने गुरुजींच्या नावाने त्यांनी उभं केलेलं आरोग्य मंदिर आणि शाळा हे हेगडेंच्या स्मृती अमर करणार आहेत. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं देहदान केलं गेलं. त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला आहे कपिल पाटील यांनी...

कवी वसंत बापटांच्या 'देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना...' या प्रार्थनेतली 'मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना' ही ओळ गावी ती लीलाधर हेगडे यांनीच. भुपेन हजारिका यांचा आवाज तुम्ही ऐकलाय का? मी तुलना बिलकुल करत नाही. पण त्यांचा भारदस्त आवाज आणि त्यातली घन आर्तता तुम्हाला अनुभवता येईल जेव्हा लीलाधर हेगडे ही ओळ गात होते तेव्हा. लीलाधर हेगडे यांनी साने गुरुजींच्या पंढरपूर सत्याग्रहात वसंत बापटांसोबत 'महाराष्ट्र शाहीर' कार्यक्रम महाराष्ट्रभर नेला. आणि राष्ट्र सेवा दल कलापथकाला नवा आवाज मिळाला.



सेवा दलाचे शाहीर आणि कलापथकाचा आवाज एवढीच लीलाधर हेगडे यांची ओळख नाही. महाराष्ट्र दर्शन, शिव दर्शन, भारत दर्शन अशा एका पाठोपाठ एका कलापथकीय कार्यक्रमांमुळे सेवा दलाला देशभर एक नवी ओळख मिळाली. त्या मागचा आवाज अर्थात लीलाधर हेगडे यांचा होता. पण लीलाधर हेगडे यांचं मोठं काम हे की, अस्पृशता निवारण चळवळीत आपलं उमेदीचं आयुष्य त्यांनी झोकून दिलं. भिंगरी लागून गावोगाव फिरले. कैक मंदिरं खुली केली. कधी संघर्ष करावा लागला. कधी नैराश्य आलं. पण डफावरची थाप थांबली नाही.

Tags:    

Similar News