Pannalal Surana passed away : पन्नालालजी गेले!

समतेच्या पायावर समाज उभा करण्याचं स्वप्न सत्यात उतरवणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्याविषयी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा लेख

Update: 2025-12-03 02:20 GMT

मला आठवतं.

सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. Pune पुण्यातील 'रानडे इन्स्टिट्यूट'मध्ये आम्ही Journalism पत्रकारितेचे शिक्षण घेत होतो. साक्षात अरूण साधू आमचे विभागप्रमुख होते. खर्‍या अर्थाने तो 'पत्र'कारितेचा काळ होता. संवादासाठी व्हाट्सॲप वा आणखी माध्यमे नव्हती. आधी पेजर आणि मग मोबाइल ही मिरवण्याची गोष्ट होती. Email इ-मेल वापरणार्‍या प्राण्याला भयंकर टेक्नोसॅव्ही वगैरे मानण्याची पद्धत होती. त्यामुळे 'पत्र' हीच संवादाची खात्रीची सोय होती.

पन्नालाल सुराणा यांचे 'ग्यानबाचे अर्थकारण' त्याच सुमारास आलं होतं. ते वाचून मी पन्नालालजींना पत्र लिहिलं. पत्रकार म्हणून मी काय वाचायला हवं, कसं लिहायला हवं, असं काही त्या पत्रात होतं. माझ्या भाबड्या प्रश्नांवर पन्नालालजींचं सविस्तर उत्तर आलं. वापरलेली पाकिटं उकलून जो पाठकोरा कागद मिळतो, अशा कागदांवर लिहिलेलं ते पत्र होतं. धावत्या चित्रासारखं पन्नालालजींचं अक्षर. ओघात लिहिलेलं ते पत्र म्हणजे जणू 'आपलाचि वाद आपणाशी'! सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणारी आणि मूल्यं उराशी बाळगत झेपावणारी जी 'पॅशनेट' पत्रकारिता पन्नालालजींनी सांगितली, ती तेव्हाही नजरेच्या टप्प्यात नव्हती. आज तर अशा पत्रकारितेचा पत्ता शोधूनही सापडणार नाही!

काळ निराश करणारा खराच, पण तरीही आजवर उमेद कायम राहिली. कारण, तेव्हा मला दीर्घ पत्र लिहिणार्‍या 'पन्ना'लालांची उमेद व्या नव्वदीतही तीच असते. आजही अशा एखाद्या पाठकोर्‍या कागदावर शेती विधेयकाबद्दल पन्नालाल लिहित असतात. त्यासाठी रस्त्यावर उतरू शकतात. आणि, सत्तेला जाब विचारू शकतात. नव्वदीतही असा योद्धा रिंगणात असताना, आपल्याला जहाज सोडण्याची परवानगी कशी असू शकते? सारं कोसळत असतानाही, हा माणूस उभा असतो. इतरांनाही उभं करतो. किल्लारीत धरणी दुभंगली, तेव्हा इतस्ततः झालेल्या लेकरांना मायेचं आभाळ देणारा हाच बापमाणूस असतो! लोकशाही समाजवादासाठी आयुष्य पणाला लावणार्‍या पन्नालालजींच्या या सच्चेपणानं थक्क व्हायला तर होतंच. शिवाय, त्यांची ही पायपीट आपल्यालाही पावलांपुरता प्रकाश देत असते. 'एकला चलो रे' म्हणत हा माणूस गेली इतकी वर्षे धावतो आहे. 'आउट ऑफ साइट' वर्गाचा आवाज होतो आहे. शहाण्यांच्या या दुनियेत असा एखादा वेडा माणूस असतो, म्हणून माणूसपणावरचा विश्वास असा अढळ राहातो.

तो माणूस जातो, तेव्हा सगळंच संपलंय, असं वाटू लागतं.

मला आठवतं. पुण्यात शिकत असताना एके दिवशी भाई वैद्य म्हणाले, 'संजय, या रविवारी आपल्याला पन्नालाल सुराणांना भेटायला जायचंय. मनात आलं, महाराष्ट्राचा माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्रातला एक ख्यातकीर्त माजी संपादक यांच्या भेटीचे आपण साक्षीदार ठरणार! तोवर अशा काही 'सेलेब्रिटीज'च्या भेटीगाठी झाल्या होत्याच. पण, सकाळी पहिला धक्का बसला. माजी गृहमंत्री आणि मी एसटीच्या लालपरीने निघालो होतो. धुळीनं माखलेल्या रस्त्यावरून धुळाक्षरे गिरवत माझं शिक्षण सुरू झालेलं होतं. परंडा तालुक्यातल्या आसू नावाच्या दुर्गम गावात आम्ही आलो. तिथून मग पन्नालालजींच्या शेतात. ते तेव्हा काही शेतीविषयक, पर्यावरणविषयक प्रयोग करत होते.

उन्हाळ्याचे दिवस होते. चालताना मी घामेघूम झालो. पण, भाई मस्त गप्पा मारत होते. आम्ही त्यांच्या शेतावर पोहोचलो. मग पन्नालालजींनी जलसंधारणाच्या प्रयोगांची माहिती दिली. काही अनुभव सांगितले. शेती प्रश्नाची चिकित्सा केली. भाई आणि पन्नालालजी मग ॲडम स्मिथ ते शरद जोशी अशा जग कवेत घेणार्‍या गप्पा मारत होते. मला हा धक्का होता. दोन वर्षांपूर्वीच एका मोठ्या दैनिकाचा मुख्य संपादक असणारा, समाजवादी पक्षाचा राज्याचा नेता असणारा हा माणूस आसूसारख्या आडवळणी गावात शेतीचे प्रयोग करतो आहे... दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यांतले आसू पुसतो आहे!

लौकिकाची पर्वा कधी पन्नालालजींनी केली नाही. आपल्या मूल्यांशी कधी तडजोड केली नाही. नव्या पिढीच्या 'करिअरिस्ट' संपादकांना अथवा मुत्सद्दी राजकीय नेत्यांना ही पॅशन कधी समजणारही नाही. दुष्काळ असो की वंचितांचे प्रश्न, हा माणूस चालत सुटतो. राष्ट्र सेवा दलाला नवी दिशा देतो. साहित्य संमेलनांना उभारी देतो. नव्या पिढीशी संवाद साधताना साने गुरुजी कथामालेला नवी ऊर्जा देतो! या सगळ्या धावपळीत अखंड वाचतो, चिंतन करतो, तीस - पस्तीस पुस्तकं लिहितो. त्याचवेळी, थेट राजकीय भूमिका घेत संसदीय राजकारण करू पाहातो आणि राष्ट्रीय स्तरावर समाजवादी विचारांची पेरणी करत राहातो. मार्ग अनेक असतील, पण या पायपीटीचा केंद्रबिंदू असतो, तो या देशातला सामान्य माणूस. समतेच्या पायावर समाज उभा करण्याचं स्वप्न हेच या वेड्या मुसाफिराचं इंधन असतं. आणि, म्हणून चालण्याचं बंधन असतं.

पन्नालालजी थोडं शहाण्या माणसासारखं वागले असते, तर त्यांना हवी ती पदं मिळाली असती. हवी ती सत्ता मिळाली असती. सगळं वैभव समोर उभं राहिलं असतं. पण, मग त्यांच्या चेहर्‍यावर हे असं निरागस हसणं फुललं नसतं. आणि, डोळ्यांत नवजात स्वप्नं उमलली नसती. मग, भूकंपानं उपटली गेलेली कोवळी आयुष्यं उभी राहू शकली नसती. या घनघोर अंधारात आशेची पणती मग अशी तगू शकली नसती.

पन्नालालजी,

आज तुम्ही हवे होता.

अंधार वाढत असताना, या क्षणी किती एकटं वाटतंय म्हणून सांगू!

- संजय आवटे

(ज्येष्ठ पत्रकार)

(साभार- सदर पोस्ट संजय आवटे यांच्या फेसबुक पेजवरून घेतली आहे.)

Similar News