मॅक्स महाराष्ट्र : पत्रकारितेचा प्रवास, जनतेचा आवाज
आज मॅक्स महाराष्ट्र परिवारासोबत माझी पाच वर्षे पूर्ण झाली… आणि त्याचवेळी मॅक्स महाराष्ट्र चळवळीच्या दहाव्या वर्धापन दिनाचा हा ऐतिहासिक क्षण साजरा होतोय. या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना, प्रेक्षकांना आणि सहकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
मॅक्स महाराष्ट्र हे केवळ एक न्यूज पोर्टल किंवा चॅनेल नाही, तर ते पत्रकारितेचं विद्यापीठ आहे. आज समाजात कार्यरत असलेले अनेक संवेदनशील, तळागाळातील प्रश्न मांडणारे पत्रकार हे मॅक्स महाराष्ट्राच्या जडणघडणीतून घडले आहेत. आज ते विविध मेनस्ट्रीम न्यूज चॅनेल्समध्ये काम करत आहेत. जवळपास प्रत्येक मोठ्या मीडिया हाऊसमध्ये मॅक्स महाराष्ट्र परिवारातील एखादा तरी सदस्य कार्यरत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे.
या पाच वर्षांच्या प्रवासात मॅक्स महाराष्ट्रचे चढ-उतार मी अगदी जवळून पाहिले आहेत. संघर्ष, अडचणी, आर्थिक मर्यादा, दबाव… पण तरीही सत्याशी तडजोड नाही हाच या चळवळीचा आत्मा आहे.
अनेकदा इलेक्ट्रॉनिक मीडियाने दुर्लक्षित केलेले, बाजूला सारलेले विषय मॅक्स महाराष्ट्रने ठामपणे मांडले. कोकणातील दुर्गम भाग, दऱ्या-खोऱ्यातील धनगरवाड्या, आदिवासी पाडे, वस्त्या जिथे रस्ता, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत गरजाही पोहोचल्या नव्हत्या, तिथे जाऊन रिपोर्टिंग करण्याची संधी मॅक्स महाराष्ट्रमुळे मला मिळाली.
आम्ही केलेल्या त्या रिपोर्टिंगचा प्रत्यक्ष फायदा जनतेला झाला. अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्या, कामे सुरू झाली. आजही त्या गावांमधील स्थानिक नागरिक फोन करून “मॅक्स महाराष्ट्रमुळे आमचा प्रश्न सुटला” असं सांगतात, तेव्हा पत्रकार म्हणून समाधान वाटतं.
मॅक्स महाराष्ट्रमुळेच माझीही एक वेगळी ओळख निर्माण झाली. टीव्हीवर पाहिलेले नेते प्रत्यक्ष भेटीत संवाद साधताना, त्यांच्या मुलाखती घेताना पत्रकार म्हणून आत्मविश्वास मिळाला. भारत जोडो यात्रा असो, महापरिनिर्वाण दिन असो, दसरा मेळावा असो प्रत्येक वेळी संपूर्ण टीम मैदानात उतरून, ऊन-पावसाची तमा न बाळगता प्रामाणिकपणे काम करताना दिसते.
आजच्या काळात अनेक चॅनेल्सना राजकीय अजेंडे आहेत. पण मॅक्स महाराष्ट्रचा पहिला आणि शेवटचा अजेंडा म्हणजे जनता. गोरगरीब, वंचित घटक, सामान्य नागरिक, फेरीवाले, रिक्षावाले — ज्यांच्या बातम्या कुठेच दाखवल्या जात नाहीत, त्यांचा आवाज बनण्याचं काम मॅक्स महाराष्ट्रने केलं आहे आणि आजही करत आहे.
आज मॅक्स महाराष्ट्र आपल्या दहाव्या वर्धापन दिनात पदार्पण करत आहे. हा केवळ एक टप्पा नाही, तर एका विचारांची, एका लढ्याची दखल आहे.
या वर्धापन दिनानिमित्त मॅक्स महाराष्ट्र परिवारातील प्रत्येक सदस्याला, प्रत्येक वाचकाला आणि प्रेक्षकाला मनःपूर्वक शुभेच्छा! आपली साथ सदैव मॅक्स महाराष्ट्रसोबत राहो, हीच अपेक्षा…
— पत्रकार कृष्णा कोलापटे