कितीतरी दिवसांपासून असं काहीतरी लिहायचं मनात होतं. आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात बरे-वाईट अनुभव येत असतात. मानवी मनाचा नकळतपणे नकारात्मक गोष्टी लक्ष ठेवण्याकडे कल असतो. तोंडातला एक दात पडला तर जीभ सारखी त्या मोकळ्या जागेकडे जाते. पण ३१ दात मुखात शिल्लक आहेत याचा विसर पडतो.
ही लेखमाला म्हणजे या ३१ दातांचं केलेलं स्मरण आहे. मला, माझ्या मोठ्या भावाला, आई-वडिलांना exceptional चांगले अनुभव आले आहेत. ते लिहून कुठेतरी त्या लोकांचं ऋण किंचित फेडण्याचा प्रयत्न आहे. तसं ते फेडल्या जाऊ शकत नाहीच. सद्भावना आणि जीवनमूल्य ही संसर्गजन्य व्हावीत ही लेखामागची खरी प्रेरणा आणि भावना... शिवाय भवताली जे सुंदर gestures (gestures साठी मला तरी मराठी शब्द सुचला नाही. कोणाला सुचल्यास जरूर सांगावा) दिसतील ते ही पोहोचवेन..
हे जपायला हवं….
काकासाहेब चितळ्यांच्या चरित्रलेखनाच्या एका प्रोजेक्टवर काम करत असताना एक विलक्षण अनुभव आला. मुंबईला एका वृद्ध जोडप्याकडे मुलाखतीसाठी गेले होते. पंजाबी भाषा बोलणारं धट्टकटं सरदार कुटुंब. आजोबा होते वय वर्ष ८५ आणि आजी ८०. दोघेही तब्येतीने अगदी खणखणीत. मी येणार म्हणून आवर्जून खाण्यापिण्याची छान तयारी करुन ठेवली होती. खूप गप्पा-गोष्टी झाल्या, चर्चा झाली. मी त्यांना म्हटलं मी निघते आता... त्याचवेळी ते आजोबा त्यांच्या ६० वर्षांच्या मुलाला काही विचारत होते. तो मुलगा त्यांना नाही म्हणाला असं मला जाणवलं.
मी निघताना माझ्या सवयीप्रमाणे त्या आजोबा-आजींना खाली वाकून नमस्कार केला. तर त्या आजोबांनी माझ्या हातात ५०० रुपये ठेवले. मी ते हातात घेत म्हटलं की, मैं आज इसे ना नही कहुंगी, क्यों की यह आपका आशीर्वाद है...
आणि खरं सांगते त्या दिवशी अनेक वर्षांनी आपण लहान आहोत असा फिल आला. संसाराच्या रहाटगाडग्यात आणि विशेषत: वडील गेल्यानंतर जबाबदारीच्या ओझ्यानं जीव मेटाकुटीला आला होता. त्या दिवशी त्या आजोबांनी हातात पाचशेची नोट ठेवल्यावर एवढं नॉस्टॅल्जिक झाले. माझ्या लहानपणी मोठ्या माणसांना नमस्कार केल्यावर ते हातात खाऊसाठी काहीतरी ठेवत असत. त्या खाऊच्या पैशाच्या आशेनेही आम्ही लहान मुलं नमस्कार करत असू. हे सगळं आठवलं. आता खरी गंमत पुढे आहे.
मी त्या आजी-आजोबांकडून निघाले तर रात्रीचे ९ वाजले होते. पुण्यात परत येता येता रात्रीचे दीड वाजले. तोवर दर तासा तासाने ते आजी-आजोबा मला फोन करत होते. रात्री दीड वाजता मी पोहोचल्यावर जेव्हा त्यांना पोहोचल्याचा फोन केला तेव्हा ते झोपी गेलेत. काही नातं नाही.. पहिल्यांदाच भेट.. तरीही आपली सख्खी नातंच जणू काही पुण्यात रात्री पोहोचते आहे अशा काळजीने ते जागे होते. एका भावपूर्ण नमस्कारानं किती चित्र बदलवून टाकलं होतं. हा भाव मला पूर्वेची विशेषत: भारताची श्रीमंती वाटतो. हा अनुभूतीचा विषय आहे! पश्चिम तर्कावर आधारीत आहे. पूर्व भावावर...
ओशोंचं एक फार सुंदर वाक्य आहे..’’पुरूष तर्क से जीता है और स्त्री अनुभूति से.. और जब भी तर्क और अनुभूति में दौड़ होगी.. तर्क हार जायेगा अनुभूती जीत जायेगी”…
पार्थिव, संपत्ती, सत्ता आणि उपभोग संपल्यावर हा भावाचा प्रदेश सुरू होतो. इथे मी भाव हा शब्द वापरतेय. भावना नाही याची कृपया नोंद घ्यावी.
भारतातली ही नाती, या परंपरा, हे संस्कार हे मला भारतीय संस्कृतीचं फार लोभस आणि विलोभनीय वैशिष्ट्य वाटतं. जे एकमेवाद्वितीय आहे.
वडीलधारे असतील, गुरू असतील नमस्काराचा हा संस्कार आपण आग्रहाने जपला पाहीजे. जो आज लुप्त होताना दिसतो आहे. आमच्या लहानपणी कोणी मोठे आले तर नमस्कार करा हे सांगायची गरजच नसे. आजचे किती पालक आपल्या मुलांमध्ये जाणीवपूर्वक हा संस्कार जोपासताहेत. नमस्कार हा कृतज्ञतेचा संस्कार आहे, विनम्रतेचा संस्कार आहे. गुरूंना केलेला नमस्कार, आई-वडीलांना केलेला नमस्कार, सकाळी उठून भूमीला पादस्पर्शं क्षमस्व मे म्हणत केलेलं वंदन, नदयांची होणारी आरती, मध्यप्रदेशात तर वर्षातून एकदा नर्मदेला साडी नेसवून नमस्कार करण्याचा सोहळाच होतो.
हजारो आकाशगंगा, पृथ्वी, सूर्यमाला, हे अनंत कोटी ब्रह्मांड, जीवनाच्या अनन्वित शक्यता... तुम्ही शिकतच राहू शकता आणि केवळ विनम्रच होऊ शकता. अकड मुर्दे की पहचान है. या झुकण्यातून, लीन होण्यातून सर्जनाच्या किती शक्यता उमलू शकतात.
एका पुरस्कार समारंभात इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी पुरस्कार स्वीकारताना रतन टाटांना खाली वाकून नमस्कार केल्याचं छायाचित्र सर्व वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालं होतं. त्यावेळी मूर्तींच्या या gestureची खूप वाहवा झाली होती.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना प्रसिद्ध झालेली एक बातमी आठवतेय. त्या बातमीचं शीर्षक होतं. Even the Prime minster has compelled to touch her feet दक्षिण भारतातल्या एक खेड्यातल्या अशिक्षित वृद्ध स्त्रीनं स्वत:च्या कल्पनेनच लाखो गरीब महिलांच्या बचत गटांचं जाळं उभं केलं होतं. ते काम इतकं अतुलनीय होतं की पंतप्रधान वाजपेयींनी तीच्या कामाला सॅल्युट म्हणून तिला खाली वाकून नमस्कार केला.
भारतीय संस्कृतीचं हे निर्विवाद सौंदर्य आहे. माझे वडील मला सांगत ‘’बेटा एक नमस्कार तुमचं जीवन फार सुकर करू शकतो. आपल्या हातून कुठली चूक झाली तर मोठ्या माणसांची मनापासून माफी मागायची आणि नमस्कार करायचा. तुमची मोठी शिक्षा टळून जाईल याने’’...
नमस्कार केल्यावर दिलेला आशीर्वाद हा संरक्षक कवचासारखं काम करतो हा माझा तरी विश्वास आहे. भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नमस्काराचा संस्कार तुम्हाला सर्वत्र सारखा दिसेल. संस्कृतीचे हे कवडसे सर्वत्र सारखे चमकताना दिसतात, धर्म वेगवेगळे असतील, भाषा वेगळ्या असतील, पोशाख-पदार्थ वेगळे असतील, पण संस्कृती एक आहे.
धर्मापेक्षा संस्कृती मोठी आहे हा महत्वाचा विचार सुप्रसिद्ध शायर निदा फाज़ली यांनी मांडला होता. भारतात प्रत्येक राज्य हे स्वतंत्र राष्ट्र होऊ शकते हा विचार मांडणाऱ्यांनी हा संस्कृतीचा जोडणारा बांधून ठेवणारा दुवा लक्षात घेतलेला दिसत नाही. आईचं प्रेम, वडिलांचा दरारा, बहिणीची माया आणि भावाची जबाबदारी… हे भारतात कुठेही जा सारखंच सापडेल!
भारतीय संस्कृतीत गुरूचं अपरंपार महत्व आहे. सोबतच नमस्काराचं... आपल्या मुलांना मोठ्या लोकांना जाणीवपूर्वक नमस्कार करायला लावायला हवा. या संस्काराचं वहन व्हायला हवं!
काल भारतीय महिला चमूने क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यातले विजयाच्या जल्लोष करणारे, खेळाडू मुली भावूक झालेले अनेक फोटो व्हायरल झाले. पण मला सर्वात जास्त आवडला तो कोच अमोल मुजुमदार यांना हरमनप्रीत कौर खाली वाकून नमस्कार करत होती. काय सुंदर जेश्चर होतं ते.
अमृता प्रीतम यांच्या शब्दात सांगायचं झालं तर...
माँओं की चेहरे की जगमगाहट,
बहनों की चुडियों की खनखनाहट,
प्रेयसी के दुपट्टे की सरसराहट
और समय की आहट
सभी जगह एक जैसी होती हैं...
लीन होऊयात..नतमस्तक होऊयात...
जय भारत
वसुंधरा काशीकर
(लेखक, निवेदक, मुलाखतकार, स्वतंत्र पत्रकार, भाषा सल्लागार )
(साभार -सदर पोस्ट वसुंधरा काशीकर यांच्या फेसबुक भिंतीहून घेतली आहे)