Dr. Baba Adhav सत्यशोधकाचा बुलंद आवाज शांत झाला !
महात्मा फुलेंचा समृद्ध सत्यशोधकी वारसा स्वातंत्र्योत्तर काळात समर्थपणे पुढे नेणारे कष्टकऱ्यांचे नेते बाबा शांत झाले.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापना काळात हमीद दलवाईच्या सोबत जे निवडक समर्थक होते त्यात डाॅ. बाबा आढाव हे आघाडीवर होते. या चळवळीस मुस्लीम सत्यशोधक हे नाव असावे हे बाबांनीच सुचवले आणि ते दलवाईसह सर्वांना आवडले. मुस्लीम सत्यशोधक चळवळाची सुरुवात होत आहे याचा बाबांना इतका आनंद झाला की ते स्थापना दिनी ढोल ताशाच्या मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आले. ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहीले. बाबांचा आधार म्हणजे हिमालयाची शक्ती आपल्या सोबत आहे हा विश्वास! आणि त्यांचे नसने हे खोल दरीच्या पोकळीची जाणीव करून देणारे आहे.
बाबांची थोरवी सर्वश्रुत आहेच. महात्मा फुलेंचे सत्यशोधक विचार आणि महात्मा गांधीचा सत्याग्रही आचार हे बाबांच्या जीवनातील दोन मुख्य आधार राहिले आहेत. महाराष्ट्रातील जाणत्या लोकांना बाबांचे कार्यकर्तृत्व सुपरिचित आहे. त्यांच्या चौफेर, अफाट सामाजिक कार्याची कृतज्ञतापूर्वक दखल घेऊन मराठवाड्यातील समाज आणि साहित्य क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांनी मागील मार्च महिन्यात त्यांना "महात्मा" पुरस्काराने गौरविण्याची गळ घातली. "महात्मा" शब्दास आभाळाइतका मोठा संदर्भ असल्याने तो पुरस्कार स्वीकारण्यास विनम्रपणे त्यांनी असहमती दर्शविली. तसेच तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील काही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांनी बाबा "महाराष्ट्र भूषण" स्वीकारतील का याची चाचपणी केली होती. परंतु हे पुरस्कार केवळ अलंकाराप्रमाणे असल्याने अशा भूषणापलिकडे गेलेल्या बाबांनी त्यासही अनुकूल प्रतिसाद दिला नाही. अशा पुरस्काराबद्दल उदासीन असण्याचे दुसरे कारण म्हणजे सध्याची अस्वस्थ करणारी धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती! आजच्या विदारक, अनैतिक राजकीय परिस्थितीत सत्यशोधक आणि सत्याग्रही बाबांनी अशा पुरस्कारांचा आनंद घेणे हेच त्यांच्या स्वभावात बसणारे नाही.
सत्यशोधकी वारसा, साधनशुचिता, संविधानिक मूल्यांचे संवर्धन, प्रसरण, आचरण करणार्या बाबांचे समाजप्रबोधन चळवळीतील योगदान सर्वश्रुत असले तरी उजळणी म्हणून नजर टाकल्यास गोवा स्वातंत्र्य संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग तसेच "एक गाव-एक पाणवठा, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, एक मत-समान पत, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कष्टकरी पंचायत, कष्टाची भाकर केंद्र, कागद-काच-पत्रा वेचक, विषमता निर्मूलन समिती, राष्ट्रीय एकात्मता समिती, जाती निर्मूलन, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन असे अनेक उपक्रम आणि महिला, देवदासी, कामगार, अंगमेहनत करणार्या बांधवांना न्याय आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी बाबांनी केलेली आंदोलने, सत्याग्रह, उपोषणे महाराष्ट्रातील जनतेने पाहिली आहेत. यासाठी जवळपास साठवेळा बाबांनी तुरूंगवास स्वीकारला. त्यांनी केलेल्या विधायक आणि प्रबोधनात्मक कामाची यादी लांबलचक आहे. जयपूरच्या उच्च न्यायालयासमोरील मनूचा पुतळा हटवावा म्हणून पदयात्रा काढून सत्याग्रह केला. कष्टकऱ्यांना पेन्शन मिळून देण्यासाठी अनेक मेळावे आणि परिषदांचे आयोजन केले. त्यास राष्ट्रीय पातळीवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सार्वत्रिक पेन्शनचा हक्क, सामाजिक सुरक्षा कायदा, अन्न सुरक्षा हक्क यांसाठी बाबांनी जनजागृती अभियान उभे केले. महात्मा फुले समता प्रतिष्ठान मार्फत फुले - आंबेडकर व्याख्यानमालेची सुरुवात बाबांनी बावन्न वर्षापूर्वी केली. 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी दिनी उद्घाटन आणि 6 डिसेंबर रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनी समारोप. असे नऊ दिवस ही व्याख्यानमाला चालते. यातील प्रत्येक व्याख्यानाच्या वेळी बाबा समोर पहिल्या रांगेत पहायची आम्हाला सवयच झाली. यावर्षी उद्घाटनाच्या व्याख्यानात 'भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ' विषयावर डाॅ. अभिजीत वैद्य वक्ते आणि डाॅ. बाबा आढाव अध्यक्षस्थानी अपेक्षित होते. परंतु पुना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या बाबांची तब्येत इतकी बिघडली की ही व्याख्यानमा रद्द करावी लागेल की काय अशी शंका निर्माण झाली. बाबांच्या जागी मला अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि ही संपूर्ण व्याख्यानमाला नियोजित पध्दतीने पार पडली. यातील प्रत्येक व्याख्यानात बाबांची अनुपस्थिती अस्वस्थ करणारी होती. पण परवाच ही व्याख्यानमालेचा समारोप झाला.
पुरोगामी सत्यशोधक हे त्रैमासिक पन्नासहून अधिक वर्षे नियमित चालू आहे.
बाबांचा महाराष्ट्रातील सामाज परिवर्तनाच्या चळवळीतील सहभाग अनेक कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभ आहे. डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर, लक्ष्मण माने यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी समाजकार्याची प्रेरणा बाबांच्या सहवासात राहून घेतली आहे.
आजही जनसामान्यांचे होणारे शोषण, सामाजिक-आर्थिक विषमता, विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार हे जुने प्रश्न अनुत्तरित आहेत. यात वाढती धर्मांधता, अशा धर्मांधतेला मिळत असलेली समाज मान्यता आणि राजकीय अभय याची भर पडली आहे. धार्मिक शत्रूभाव, अल्पसंख्याकांची वाढती असुरक्षितता, बहिष्काराची भाषा, धर्म आणि राजकारणाची हातमिळवणी आणि यातून होणारी संविधानिक मूल्यांची पायमल्ली बाबांना खूप अस्वस्थ करते. त्यांना वाटते, "धनवंतावर सरकार सवलतींचा पाऊस पाडतेय त्यामुळे धनवंताच्या दंडात सोन्याचा पिळा बसला आणि गरिबांच्या पोटाचा पीळ आणखी करकचला. देशातील अनेक धर्मदाय धार्मिक संस्थाकडे सोने आणि संपत्ती पडून आहे. या धार्मिक संस्था खूप श्रीमंत आहेत पण लोक कुपोषणामुळे मरत आहेत आणि दुसरीकडे देशाची तरक्की होत असल्याचे सांगण्यात येते.” या विरोधाभासाचा सामना कसा करायचा?
"भारत भाग्यविधाता" हे केवळ राष्ट्रगीतात असून चालणार नाही. सर्वसामान्य भारतीयांना तसे वाटले पाहिजे परंतु यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. हे चित्र कधी बदलणार? शिवाजी महाराज आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा आणि पुरोगामी बिरुदावली लाभलेल्या महाराष्ट्राचे झालेले नैतिक, सांस्कृतिक आणि राजकीय अधःपतन हे बाबांना अस्वस्थ करत. ही अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी वयाच्या ९५ व्या वर्षी फुलेवाड्यात २६ नोव्हेंबर रोजी म्हणजे संविधानदिनी सत्याग्रही बाबांना अमरण उपोषण करावे लागले. नेते मंडळी बाबांचा हा आत्मक्लेश संवेदनशीलतेने समजून घेतील का?
बाबांच्या नेतृत्वात किंवा त्यांचा सहभाग असलेल्या प्रत्येक सार्वजनिक किंवा संघटनात्मक कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमीच महात्मा फुलेच्या "सत्य सर्वांचे आदिघर - सर्व धर्माचे माहेर" या अखंडाने होते आणि शेवट "सत्यमेव जयते" या घोषणेने होते. बाबांसोबत मुंबई, कोल्हापूर, कोपर्डी, श्रीगोंदा अशा ठिकाणी प्रवास करण्याची संधी मला मिळाली. अशा प्रवासातही बाबा महात्मा फुलेंच्या अखंडाचे गायन सहप्रवासी कार्यकर्त्यांसह सामुदायिकपणे करीत. प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात ही परंपरा असावी तसेच प्रत्येक गावात, मोहल्ल्यात संविधानघर असावे अशी बाबांची अपेक्षा! या आवाहनास प्रतिसाद देत अनेक ठिकाणी संविधानघरांची सुरुवात झाली आहे. परंतु संविधान स्वीकृतीच्या अमृतमहोत्सवी वर्षांत ही मोहिम सर्वदूर पोहोचवण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न झाले पाहिजेत.
आठ-दहा वर्षांपूर्वी असदुद्दीन ओवेसी आणि जमातवाद्यांनी आम्ही "भारतमाता की जय म्हणणार नाही." अशी भूमिका मांडली होती. हिंदुत्ववाद्यांकडून प्रतिक्रिया उमटत होती. देशातील वातावरण संवेदनशील झाले होते. यादरम्यान पुण्यातील राष्ट्र सेवादलात मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा वर्धापनदिन कार्यक्रम होता. यावेळी बाबांनी सुचविले की या कार्यक्रमाची सुरुवात मंडळाने "भारतमाता की जय" घोषणा देत मोर्चा काढून करावी. ती आम्हा कार्यकर्त्यांना खूप भावली आणि बाबांच्याच नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. असदुद्दीन ओवेसी हे सर्व मुस्लिमांचे नेते किंवा प्रतिनिधी नाहीत आणि देशभक्ती किंवा 'भारतमाता की जय' या घोषणेवर कोणाची मक्तेदारी नाही असा मुस्लीम सत्यशोधकचा संदेश देणे बाबांमुळे शक्य झाले.
हजरजबाबीपणा, शाब्दिक कोटी, हास्य विनोद करणारे सदाप्रसन्न बाबा आजही नियमित कार्यालयात जातात, कार्यकर्त्यांशी आणि भेटायला येणार्यांशी चर्चा - संवाद करतात, जवळच्या लोकांची चौकशी करतात. त्यांची ऊर्जा आजही कायम आहे. डोळे कमकुवत झाल्याने वाचनावर थोडा परिणाम झाला आहे. मात्र बाबांच्या समाजकार्यात सहभागी होत घराची धुरा सांभाळणाऱ्या शीलाताई आढाव बाबांना वर्तमानपत्रे, नियतकालिक नियमितपणे वाचून दाखवीत असत अवतीभवती काय चालू आहे हे समजून घेत. सकारात्मक घडामोडींना दाद देत आणि नकारात्मकतेने अस्वस्थ होत. वृध्दापकाळातील मर्यादा आणि आजारपण गृहीत आहे. बाबांच्या व्यक्तिगत, सामाजिक आयुष्यात त्यांच्या सहप्रवासी शीलाताईंचा सिंहाचा वाटा आहे. चोहोबाजूंनी अस्वस्थता असली तरी बाबांनी पांढरे निशाण दाखवलेले नाही. बाबांचा सत्यशोधकी आणि सत्याग्रही बाणा कायम आहे.
योगायोग असा की बाबा आणि माझा वाढदिवस एकाच दिवसी येतो. 1 जून हा दिवस मी बाबांच्या शुभेच्छे शिवाय घालवला नाही.
मध्यंतरी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची गती मंदावली होती. या चळवळीच्या भवितव्याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र नव्या जोमात कार्य पाहून बाबा म्हणाले शमसुद्दिनमुळे वाळलेल्या झाडाला पुन्हा कोंब फुटावे असे दृश्य पाहता आले. या अशा अनमोल शाबासकीला आता पोरके व्हावे लागणार आहे.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा आधार म्हणून आम्ही भाई वैद्य, भाऊ पन्नालाल सुराणा आणि बाबांकडे पाहत होतो. भाईच्या नसण्याचे दुःख पचवत होतो. आता मागील आठवड्यात भाऊ पन्नालालजी गेले आणि आता बाबा ! भाई, भाऊ आणि बाबा आता नसले तरी त्यांची वैचारिक शिदोरी आमच्या सोबत राहील.
डाॅ. बाबा आढाव यांना विनम्र आदरांजली.
डॉ. शमसुद्दिन तांबोळी, अध्यक्ष: मुस्लीम सत्यशोधक मंडळ
9822679391