2026 New Year Resolutions : भारत विश्वगुरू होईल ?
नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर एक नम्र संकल्प… 2026 या नव्या वर्षात आपण 'विश्वगुरू' व्हायचे ठरवले, तर आधी काय करावं लागेल? जगाला दिशा देण्याआधी स्वतःचे अंतरंग कसे प्रभावी करता येईल? आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा नव्या वर्षातला संकल्प काय आणि कसा असावा यावर 30 देशांमध्ये भ्रमंती करणारे डॉ. सुभाष के. देसाई यांचा लेख वाचा
आयुष्याच्या संध्याकाळी उभा राहून मागे वळून पाहताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यासक, तत्वज्ञ म्हणून एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून माझ्या पिढीला एक गोष्ट स्पष्ट दिसते. राष्ट्रे मोठी घोषणा करून महान होत नाहीत; ती स्वतःच्या अंतःकरणाशी प्रामाणिक राहून महान होत असतात. आज “विश्वगुरू” हा शब्द उच्चारताना मनात एक प्रश्न उमटतो. आपण हा शब्द मिरवण्यासाठी वापरतो आहोत, की स्वतःला तपासण्यासाठी? world leader विश्वगुरू म्हणजे काय?
माझ्या समजुतीनुसार, विश्वगुरू म्हणजे असा देश जो जगाला केवळ उपदेश देत नाही, तर स्वतःच्या आचरणातून मार्ग दाखवतो. मला गौतम बुद्ध, महावीर, सॉक्रेटिस येशू, गुरू नानक, कबीर, पैगंबर, ज्ञानेश्वर, तुकाराम, विवेकानंद, अरविंद, शास्त्रज्ञ आईन्स्टाईन, रामानुज, न्यूटन, स्टीफन हॉकिंग, डॉक्टर भाभा, विक्रम साराभाई, अब्दुल कलाम, मदर टेरेसा अशांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. यांनी कधी स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेतले नाही. तरीही जगाने त्यांना ऐकले, कारण त्यांच्या शब्दांमागे अनुभव, करुणा आणि आत्मसंयम होता. Gautam Buddha, Mahavira, Socrates, Jesus, Guru Nanak, Kabir, the Prophet, Dnyaneshwar, Tukaram, Vivekananda, Aurobindo, scientists like Einstein, Ramanujan, Newton, Stephen Hawking, Dr. Bhabha, Vikram Sarabhai, Abdul Kalam
The Constitution संविधान : आधुनिक भारताचा मौन गुरु…
स्वातंत्र्यानंतर भारताला एक अमूल्य वारसा मिळाला तो म्हणजे संविधान. ते केवळ कायद्यांचे पुस्तक नाही. ते धर्म, जात, भाषा यांपलीकडे जाणाऱ्या नैतिकतेचे घोषणापत्र आहे. जर या संविधानातील मूल्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आपल्या सार्वजनिक जीवनातून हळूहळू गळून पडत असतील, तर “विश्वगुरू” हा शब्द आपोआप कोरडा ठरतो.
Science and Reason विज्ञान आणि विवेक : प्रश्न विचारण्याचे धैर्य
मी विज्ञानाच्या प्रगतीचा साक्षीदार आहे. पण विज्ञान म्हणजे केवळ तंत्रज्ञान नव्हे; विज्ञान म्हणजे प्रश्न विचारण्याची निर्भयता. जर प्रश्न विचारणारा विद्यार्थी घाबरत असेल, संशोधकावर संशय घेतला जात असेल, आणि अंधश्रद्धेला सत्तेचा आधार मिळत असेल. तर विज्ञान प्रगत होत नाही, ते केवळ वापरले जाते. जेव्हा आमच्या देशाचा पंतप्रधान गणपती चे वर्णन करताना मानवी धडावर हत्तीचे डोके लावण्याची प्लास्टिक सर्जरी भारतीयांनी केली असे म्हणतो त्यावेळेला या तथाकथित विश्वगुरूचे अज्ञान उघडे पडते. कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवजातीसमोर उभे ठाकलेले नवे आव्हान आहे. मात्र खरी परीक्षा तंत्रज्ञानाची नाही. आपल्या नैतिकतेची आहे.
मी इजराइल ला गेलो होतो तेव्हा टेक्नेनॉन विद्यापीठांमध्ये मला आढळले की एका विद्यापीठांमध्ये नऊ शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषक मिळाले आणि आज भारतामध्ये शेकडो विद्यापीठामधून एकालाही नोबेल मिळत नाही उलट आयआयटी सारख्या संस्था निर्माण करणाऱ्या जवाहरलाल नेहरूंची टिंगल टवाळी करण्यात अडाणी पुढाऱ्यांना भूषण वाटते. AI माणसाला सशक्त करत असेल, गरिबाला संधी देत असेल रुग्णाला दिलासा देत असेल तर तो प्रगतीचा मार्ग आहे. पण जर तो भीती निर्माण करत असेल, नियंत्रण वाढवत असेल आणि माणसाला आकड्यात रूपांतरित करत असेल तर आपण थांबून विचार केला पाहिजे.
Health and Education आरोग्य आणि शिक्षण : राष्ट्राची खरी संपत्ती
आयुष्यात मला एक गोष्ट कळली देशाची खरी संपत्ती म्हणजे आरोग्यदायी आणि शिक्षित नागरिक. महागडे रुग्णालय, खासगी शिक्षणसंस्था, जागतिक क्रमवारी या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. महत्त्वाचे हे आहे की शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य आणि शिक्षण पोहोचते का?
शांततेची परंपरा आणि संरक्षणाची जबाबदारी
भारताने नेहमीच युद्धाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला. संरक्षण सज्जता आवश्यक आहे, पण ती अहंकाराची भाषा बोलू नये. शांतता ही कमजोरी नसते. ती अनुभवातून आलेली प्रगल्भता असते. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर एक नम्र संकल्प… या नव्या वर्षात आपण विश्वगुरू व्हायचे ठरवले, तर आधी चांगले विद्यार्थी होऊया. जगाकडून शिकूया, स्वतःला तपासुया, आणि आपल्या मूल्यांना गमावू नका. कारण जगाला दिशा देण्याआधी स्वतःच्या अंतरंगात उजेड असावा लागतो. प्रेम, दया करूणा, स्वातंत्र्य, समानता ही मूल्य मनापासून जपावी लागतात.
डॉ. सुभाष के. देसाई
९४२३०३९९२९