Dr. Baba Adhav : डॉक्टर पासून “कष्टकऱ्यांचा डॉक्टर”

धाकटा मुलगा म्हणून माझी एक खास जाणीव आहे. बाबांनी आम्हाला फक्त रक्ताच्या नात्यांचा परिवार दिला नाही; त्यांनी आम्हाला एक प्रचंड मोठा विस्तारित परिवार दिला. हमाल–माथाडी कामगार, कष्टाची भाकरमधली माणसं, पथारी विक्रेते, कागद–काच–पत्रा कामगार, बांधकाम कामगार, रिक्षावाले, कार्यक्षम कार्यकर्ते, सहकारी, मित्रमंडळी… ही सगळी माणसं केवळ संघटनेची “मेंबरशिप” नाहीत; ही सगळी माणसं बाबांनी जोडलेला परिवार आहेत.

Update: 2025-12-09 21:05 GMT

(डॉ. बाबासाहेब पांडुरंग “बाबा” आढाव यांचे ९६ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. असंघटित कष्टकरी वर्ग, सत्यशोधक चळवळ आणि समाजवादी परंपरेचा हा महान आधारवड हरपला आहे.)

९६ वर्षांचं, असामान्य सामाजिक कार्याने लखलखणारं, तत्वनिष्ठ, समर्पित आयुष्य.

शेवटच्या काही वर्षांत मायेलोमा, हॉस्पिटल, ICU…

शरीर थकत होतं, कमजोर होत होतं,

पण शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या डोक्यात आणि मनात एकच गोष्ट चालू होती.

कष्टकरी माणूस, असंघटित कामगार, त्याचा सन्मान, त्याचे हक्क.

त्यांच्याकडे बघताना त्यांचे असंख्य मोर्चे–आंदोलने, किती वेळा अटक, किती वेळा तुरुंग, लाठ्यांचे फटके, आणि शेवटी आजारपण… देह थकला, तुटला, पण ते सरळ, ताठ उभे राहिले, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेवटपर्यंत लढत राहिले.

मला नेहमी वाटतं – वसंत बापटांची ही कविता जणू बाबांवरच लिहिलीय:

अस्सल लाकूड, भक्कम गाठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात

बाभुळझाड उभेच आहे ॥१॥

देहा फुटले बारा फाटे

अंगावरचे पिकले काटे

आभाळात खुपसून बोटे

बाभुळझाड उभेच आहे ॥२॥

हे “बाभुळझाड” म्हणजेच अथक, अशांत आपले बाबा. देहाचे तुकडे झाले, काटे पिकले, पण पाठीचा कणा त्यांनी कधी वाकवला नाही. “फुले दिसले नाहीत; पण फुले जगताना पाहिले – बाबांमध्ये” आपल्याला महात्मा जोतीराव फुले प्रत्यक्ष पाहायला मिळाले नाहीत. पण आयुष्यभर बाबांकडे बघताना माझ्या मनात एकच वाक्य येत राहिलं – आपण फुले वाचले, पण फुले जगताना पाहिले – ते बाबांमध्ये. सत्यशोधक परंपरेचा मशाल फुल्यांनी पेटवली; ती मशाल आपल्या काळात खांद्यावर घेऊन परिवर्तनाची वाटचाल करणारा खंदा फुल्यांचा वारस म्हणजे बाबा.

नानापेठेपासून सुरू झालेला प्रवास

बाबांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यातील नानापेठेत. लहान वयातच वडिलांचं निधन; त्यांची आई बबूताई, आमची आज्जी, तिने पाच मुलांना कष्टानं वाढवलं. बबूताई या वारकरी संप्रदायातून आलेल्या. त्या छोट्या नानापेठेच्या घरात विठ्ठल भक्ती होती, पण त्याचबरोबर विद्रोही तुकारामाच्या समतेचे आणि संघर्षाचे बीज लहान बाबांच्या मनात खोल रुजलेलं होतं. या घरच्या संस्कारांवर नंतर महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा ठसा बसला. जातिभेद, अन्याय, असमानता  याविरुद्ध लढणं हा केवळ विचार नव्हता; ती त्यांची नैसर्गिक दिशा बनली. किशोरवयातच ते राष्ट्र सेवा दलात सक्रिय झाले. एस एम जोशी, भाऊसाहेब रानडे, ना ग गोरे, राममनोहर लोहिया या समाजवादी नेत्यांच्या सहवासातून त्यांच्या विचारांना ठोस राजकीय–सामाजिक चौकट मिळाली. पुढे भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, बापू काळदाते या सहकाऱ्यांसोबतची आजन्म सोबत महाराष्ट्रातील समाजवादी आणि सत्यशोधक परंपरेतील एक महत्त्वाचा अध्याय ठरली.

डॉक्टर पासून “कष्टकऱ्यांचा डॉक्टर”

१९५२ साली बाबांनी ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी पूर्ण करून नानापेठेत दवाखाना सुरू केला. दुष्काळ, अन्नटंचाई, रेशनिंगचा काळ. अशा वेळी काही हमाल–माथाडी कामगार दवाखान्यात आले आणि म्हणाले “डॉक्टर, आमच्यासाठी पुढे या. आमच्यासाठी उभं राहायला कुणीच नाही.” हा प्रसंग बाबांच्या आयुष्यातील वळणबिंदू होता. याच क्षणापासून त्यांनी फक्त रुग्णांचा नव्हे, तर संपूर्ण असंघटित कष्टकरी समाजाचा डॉक्टर व्हायचं ठरवलं. डॉक्टरीचा पेशा मागे सारत त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हमाल, माथाडी, पथारीवाले, झोपडपट्टीतले मजदूर, कागद–काच–पत्रा कामगार, देवदासी, धरणग्रस्त, रिक्षावाले आणि असंघटित कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी झोकून दिलं.

हामाल पंचायत आणि माथाडी कायदा

१९५५ पासून पुण्यातील हमाल–माथाडी कामगारांना संघटित करून बाबांनी हामाल पंचायत उभी केली. त्या काळी हा वर्ग पूर्णपणे असंघटित, असुरक्षित आणि व्यापाऱ्यांच्या दयेवर अवलंबून होता. सततच्या संघटित संघर्ष, सत्याग्रह आणि आंदोलानांमधून या वर्गाला प्रथमच

•​किमान वेतन,

​•​भविष्यनिर्वाह निधी (PF),

​•​ग्रॅज्युएटी,

​•​आणि सन्मानाने काम करण्याचा अधिकार मिळाला.

या लढ्यांचा सार त्यांनी एका वाक्यात मांडला – “I own my back – माझी पाठ माझा हक्क .” कष्टकरी माणसाने स्वतःच्या पाठीवर, स्वतःच्या सन्मानावर मालकांना हक्क सांगायला शिकवणारा हा संघर्ष होता. याच कामाचा परिपाक म्हणजे “महाराष्ट्र माथाडी, हामाल आणि इतर हातमजूर कामगार कायदा”. हा कायदा फक्त मालाच्या हालचालीविषयी नव्हता; तर कामगाराच्या सामाजिक–आर्थिक सुरक्षिततेची जबाबदारी व्यापाऱ्यांच्या खांद्यावर टाकणारा होता.

“एक गाव – एक पाणवठा” आणि जातिभेदाविरुद्ध लढा

दलितांना गावातील पाणवठ्यावर समान हक्क मिळावा यासाठी बाबांनी “एक गाव – एक पाणवठा” ही चळवळ उभारली. महाराष्ट्रभर चालत, गावागावात सभा घेत, आपल्या ठराविक समजुतींना धक्का देत त्यांनी समतेचा संदेश दिला. ही चळवळ फक्त पाण्याची नव्हती; ती होती मानवी सन्मान आणि सामाजिक न्यायाची चळवळ.

​•​धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन,

​•​झोपडपट्टीतल्या कुटुंबांच्या हक्कांसाठी लढा,

​•​देवदासी निर्मूलन आणि पुनर्वसन,

​•​मुस्लिम सत्यशोधक मंडळ,

​•​आणि अखेर राष्ट्रीय पातळीवर

असंघटित क्षेत्रासाठी सामाजिक सुरक्षा व पेन्शन

यासाठी त्यांनी अनेक लढे उभारले.

“कष्टाची भाकर” – स्वस्त जेवण नव्हे, स्वाभिमानाची ताटली

१९७२ साली त्यांनी “कष्टाची भाकर” हा उपक्रम सुरू केला. कागदावर हा प्रकल्प साधा वाटतो – कष्टकरी माणसाला स्वस्त आणि पौष्टिक अन्न. पण प्रत्यक्षात ही फक्त “स्वस्त खानावळ” नव्हती; ती होती कामगारांच्या स्वाभिमानाची ताटली. नफ्याच्या मागे न लागता कष्टकरी माणसाला परवडणारा पण सन्मानाने खाता येईल असा घास मिळावा, हा हेतू या कामामागे होता.

भाई–बाबा, अनिल अवचट आणि सत्यशोधक परंपरा

बाबांचं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या काही नात्यांचा उल्लेख आवश्यक आहे. भाई वैद्य हे त्यांचे केवळ राजकीय सहकारी नव्हते; ते प्रत्यक्षात भावासारखे होते. गोवा मुक्ती, संयुक्त महाराष्ट्र, समाजवादी राजकारण, कष्टकरी चळवळी, सत्यशोधक परंपरा – जिथे बाबा, तिथे भाई; जिथे भाई, तिथे बाबा.

दुसरी बाजू म्हणजे डॉ. अनिल अवचट.

नानापेठेतील बाबांचा छोटासा दवाखाना अनिल आणि डॉ. अनिता अवचट यांनी गरीबांसाठीच्या समाजवैद्यकीय सेवेच्या दवाखान्यात बदलला. हमाल पंचायत या दवाखान्याच्या मागे आर्थिक आधार म्हणून उभी राहिली. अनिल अवचट यांच्या लेखणीतून बाबांचं काम, त्यांची करुणा, कष्टकऱ्यांबद्दलची आस, त्यांची समाजवादी संवेदना महाराष्ट्रातील हजारो वाचकांपर्यंत पोहोचली. आज भाई नाहीत, अनिल काका नाहीत, तरीही भाई–बाबा ही जोडी आणि अनिल अवचटांची लेखणी महाराष्ट्रातील सत्यशोधक–समाजवादी परंपरेचा एक महत्त्वाचा, जिवंत अध्याय राहील.

शेवटच्या दिवसांतली काळजी

बाबांच्या अखेरच्या आजारपणात, मायेलोमा आणि हृदयरोगाशी चाललेल्या लढ्यात डॉ. अभिजित वैद्य यांनी जी जबाबदारी घेतली, ती केवळ एका वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ म्हणून नव्हती. भाई वैद्य यांचे सुपुत्र, बाबांचा वसा पुढे घेऊन जाणारा एक खंदा सत्यशोधक म्हणून अभिजित यांनी बाबांची ICU ते शेवटच्या क्षणापर्यंत ज्या मायेने, ज्या संवेदनशीलतेने काळजी घेतली, ती घरच्या वडिलांची सेवा करण्यासारखीच होती.

कुटुंबीय म्हणून या आमच्या थोरल्या भावाची , डॉ. अभिजित वैद्य यांचे मनापासून आभार मानतो.

घराचा अर्धा भाग – शीलाताईंचा

बाबांच्या प्रचंड कामामागे एक अत्यंत महत्त्वाचा, पण सतत पडद्यामागे राहिलेला आधारस्तंभ आहे – माझी आई, शीलाताई आढाव. ज्या काळात बाबा मोर्चे, सत्याग्रह, जेल, दौरे यांत गुंतले होते, त्याच काळात आईने ​नर्स म्हणून नोकरी, घराची सर्व जबाबदारी, दोन्ही मुलांची जडणघडण, सासूची सेवा हे सगळं निर्विघ्न पार पाडलं. जगाने, लाठ्यांनी, तुरुंगांनी, आजारांनी, जेंव्हा जेंव्हा बाबांना मोडलं, तेंव्हा त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम शांतपणे, हसतमुखानं आईनेच केलं. बाबांच्या सार्वजनिक कामाचं जितकं श्रेय आहे, तितकाच या कामाला शक्य करून देणाऱ्या माझ्या आई शीलाताईंचा वाटा मान्य करणं हीही तितकीच मोठी ऐतिहासिक न्यायाची गोष्ट आहे.

“रक्ताच्या नात्यापलीकडचा” परिवार आणि जिवंत वारसा

धाकटा मुलगा म्हणून माझी एक खास जाणीव आहे. बाबांनी आम्हाला फक्त रक्ताच्या नात्यांचा परिवार दिला नाही; त्यांनी आम्हाला एक प्रचंड मोठा विस्तारित परिवार दिला. हमाल–माथाडी कामगार, कष्टाची भाकरमधली माणसं, पथारी विक्रेते, कागद–काच–पत्रा कामगार, बांधकाम कामगार, रिक्षावाले, कार्यक्षम कार्यकर्ते, सहकारी, मित्रमंडळी… ही सगळी माणसं केवळ संघटनेची “मेंबरशिप” नाहीत; ही सगळी माणसं बाबांनी जोडलेला परिवार आहेत.

आज त्यांच्या जाण्याचं दुःख आहे – पण मला वाटतं, त्यांचं खरं स्मारक कुठलीही मूर्ती नाही, कोणतीही इमारत नाही; त्यांचं खरं स्मारक म्हणजे –

​•​सन्मानाने सरळ चालणारा कष्टकरी माणूस,

​•​त्याच्या हक्कांचं रक्षण करणारे कायदे,

​•​आणि अजूनही या समाजवादी मूल्यांवर उभा राहणारा प्रत्येक कार्यकर्ता.

महात्मा फुल्यांच्या अखंडात एक ओळ आहे –

“सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर।

मानवाचा एकच धर्म, सत्याचाच ठेवावा मर्म;

भेदभाव, जात–पात, हे सर्व अज्ञानाचे काटे.”

बाबांनी ही ओळ आयुष्यभर जगली. आता आपल्या पिढीची पाळी आहे.  आपल्या-आपल्या जागेवरून, आपल्या क्षमतेनुसार, कष्टकरी माणसाच्या बाजूने, समतेच्या बाजूने, सत्याच्या बाजूने उभं राहण्याची. यापुढे जेव्हा जेव्हा कुणी कष्टकऱ्यांच्या अधिकारांसाठी, जात–धर्माच्या नावाने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पुढे येईल, तेव्हा कुठेतरी बाबांचा हात, बाबांची सावली, त्यांचा वसा आणि पुरोगामी सत्यशोधकी वारसा सोबत असेल. असं मला आज ठामपणे वाटतं.

– अंबर आढाव, टोरंटो कॅनडा

(साभार- सदर पोस्ट अंबर आढाव यांच्या फेसबुक पेजवरून घेतली आहे.)

Similar News