चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ नाना पटोलेंनीही दिला 10 मार्चचा मुहूर्त

Update: 2022-02-16 07:55 GMT

भंडारा : भाजप नेत्यांकडून सरकार पडण्याविषयीच्या तारखा जाहीर केल्या जातात. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च रोजी सरकार पडणार असल्याची तारीख जाहीर केली होती. त्यापाठोपाठ आता नाना पटोले यांनीही 10 मार्च चा मुहुर्त देत सरकारमध्ये मोठे बदल होणार असल्याचे म्हटले आहे. ते भंडारा येथे बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप कडून सरकार पडण्याविषयी मुहूर्त जाहीर केले जात आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चला सरकार पडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यापाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 10 मार्चनंतर सरकारमध्ये मोठे बदल होणार असल्याचे विधान केले आहे.

देशातील पाच राज्यात सध्या निवडणूका सुरू आहेत. त्यापैकी गोवा आणि उत्तराखंडमध्ये संपुर्ण तर उत्तर प्रदेशमध्ये दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर मतदानाचे पाच टप्पे बाकी आहेत. मात्र या निवडणूकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. त्यामुळे 10 मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल होतील, असे विधान नाना पटोले यांनी केले.

यावेळी नाना पटोले म्हणाले की, माझं आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी बोलणे सुरू आहे. त्यामुळे राज्यात जे काही सुरू आहे. ते दुरूस्त करण्याची वेळ आली आहे. पण त्यासाठी आम्हाला 10 मार्चपर्यंतचा वेळ द्या, असे नाना पटोले यांनी सांगितले. तर राज्याच्या मंत्रीमंडळात आपले 12 मंत्री आहेत, असे मतही यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केले.

नाना पटोले यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानापाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात सत्ता बदल होणार का?, काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का? किंवा सरकारमधील मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार याबाबत लोकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tags:    

Similar News