मुंबई : एल्गार परिषद - भीमा कोरेगाव या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रमेश गायचोर आणि सागर गोरखे यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजुर केलाय. हे दोघंही २०२० पासुन कारागृहात शिक्षा भोगत होते. अनेक दिवस कोठडीत असल्याचं कारण देत त्यांना जामीन देण्यात येत असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायाधीश अजय गडकरी आणि न्यायाधीश श्याम चांडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
रमेश गायचोर आणि सागर गोरखे हे दोघेही कबीर कला मंच या सांस्कृतिक संघटनेचे सदस्य आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ने ७ सप्टेंबर २०२० ला दोघांनाही अटक केली होती.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मते, ३१ डिसेंबर २०१७ ला पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषेदेच्या कार्यक्रमाच्या आयोजनात दोघांची महत्त्वाची भुमिका होती. तपास यंत्रणेचा आरोप आहे की, रमेश गायचोर यांनी या कार्यक्रमामध्ये भडकावू भाषण केलं होतं. यानंतर भीमा-कोरेगाव इथं हिंसाचार झाला होता. तर सागर गोरखे यांनी सांस्कृतिक गाणी आणि नृत्य सादरीकरणावेळी माओवादी विचारसरणीचा प्रसार केला आणि हिंसाचारासाठी लोकांना प्रवृत्त केल्याचा आरोप एनआयए ने केला आहे.
तपास यंत्रणेने दोघांनाही सरकारी साक्षीदार बनविण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाई अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोघांवर बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा आणि सरकार विरोधात कट रचल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे.
दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणी आतापर्यत अनेक आरोपीना दिलासा मिळाला आहे. बॉम्बे हायकोर्टाने यापुर्वी रोना विल्सन, सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे आणि सुधा भारव्दाज यांना जामीन मंजुर केला आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने पी. वरवर राव यांना वैद्याकीय कारणावरुन तर शोमा सेन, वर्नन गोंन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना गुणदोषांच्या आधारे जामीन दिला आहे.