सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, भाजपपुढे जागा टिकवण्याचं आव्हान

Update: 2019-05-12 02:45 GMT

लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यात राजधानी दिल्लीतील ७ जागांसह ५९ मतदारसंघात रविवारी मतदान होणाराय. या ५९ मतदारसंघापैकी उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणामधील मतदान हे भाजप आणि विरोधी आघाडीच्यादृष्टीनं महत्वाचं ठरणाराय. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरियाणातील सर्व म्हणजे १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील सर्व म्हणजे ७ आणि झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होणार आहे. २०१४ मध्ये या ५९ मतदारसंघापैकी भाजपनं ४४ जागा जिंकल्या होत्या. या जागा कायम राखण्याचं त्यांच्यापुढं आव्हान असणाराय.

सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात मतदान होणाऱ्या १४ पैकी १२ जागा २०१४ मध्ये भाजपनं जिंकल्या होत्या. आझमगडमधून समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव, तर तर प्रतापगड मतदारसंघातून भाजपचा मित्र पक्ष अपना दलाने विजय मिळवला होता. फूलपूरमधून केशवप्रसाद मौर्य निवडून आले होते. या १४ जागांचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व जागा जरी भाजपने जिंकल्या असल्या तरी मोदी लाट असताना समाजवादी पक्ष आणि बसपा या दोन पक्षांनी मिळविलेली मते ही भाजप उमेदवारापेक्षा किती तरी अधिक होती. अनेक ठिकाणी तर या दोन पक्षाच्या उमेदवारांची एकत्रित मते ही विजयी भाजप उमेदवारापेक्षा लाखांने अधिक होती. मात्र, तिहेरी लढतीत भाजप उमेदवारांनी बाजी मारली होती. त्यामुळं यंदा अखिलेश यादव व मायावती एकत्र आल्यानंतर उत्तर प्रदेशातील पोट निवडणुकांमध्ये या महागठबंधन आघाडीनं अनेक जागा मिळविल्या. मोदी लाटेत जर या दोन पक्षांच्या मतांची टक्केवारी चांगली होती, तर आता लाट नसताना या दोन्ही पक्षांनी आघाडी केल्यानं हे मतदारसंघ भाजपा राखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचा भाजपला जसा सामना करावा लागणाराय. तसंच पश्चिम बंगालमध्ये रविवारी मतदान होत असलेल्या सर्व आठही जागा तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या होत्या. मात्र भाजपनं त्यातही नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठा पणाला लावत ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान उभं केलेय. भाजपनं आव्हान उभे केल्यामुळं ममता बॅनर्जी यांचीही कसोटी लागणाराय.

मध्य प्रदेशात भोपाळ मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी होणाराय. इथं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांची लढत भाजपच्या वादग्रस्त उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग यांच्याशी होणाराय. तर गुणा मतदारसंघात काँग्रेसनेते ज्योतीरादित्य सिंदिया यांच्यापुढे चांगल्या मताधिक्यानं विजय मिळविण्याचं आव्हान असणाराय.

हरियाणातील १० पैकी सात जागा गेल्या वेळी भाजपने जिंकल्या होत्या. दोन जागा भारतीय लोकदल तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. यंदा भाजप आणि काँग्रेस असा सामना होतोय तर लोकदलात फूट पडलीय. त्यातून जननायक जनता पार्टी असा पक्ष जन्माला आलाय. हरियाणा विधानसभेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपल्यानं लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचं आव्हान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर आहे. लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी झाल्यास त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. यामुळेच भाजपचे नेते अधिक सावध झाले आहेत.

दिल्लीतील सातही जागा जिंकण्याचं भाजपचे उद्दिष्ट आहे. दिल्लीत भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून, त्याचा फायदा भाजपलाच होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दिल्लीत आघाडी करावी, असा प्रस्ताव आम आदमी पार्टीने काँग्रेसपुढे ठेवला होता, पण दिल्लीतील काँग्रेसनेत्यांनी त्यास नकार दिल्यानं ही बाब भाजपच्या पथ्यावर पडते की नाही हे २३ मे रोजीच स्पष्ट होणाराय.

Similar News