विलासराव देशमुख म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावरील एक अजरामर अध्याय!
"आपण कोण, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं." महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या विधानाचा समाचार घेतलाय ब्लॉगर तुषार गायकवाड यांनी
व्यक्ती आणि वल्ली मधील पुलंचे वाक्य "आपण कोण, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं." महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूर येथे हे वाक्य तंतोतत सिध्द केले.
Former Chief Minister of Maharashtra Vilasrao Deshmukh महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख हे Latur लातूरच्या व महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावरील एक अजरामर अध्याय आहेत. लातूर जिल्ह्यातील बाभूळगाव या छोट्याशा गावात २६ मे १९४५ रोजी जन्मलेले विलासराव गावच्या सरपंच पदापासून राज्याच्या मुख्यमंत्री पदावर दोन वेळा विराजमान झाले. कुसळं उगवणाऱ्या मराठवाड्यात सहकारी साखर कारखानदारी उभा करण्यात विलासरावांचे बहुमूल्य योगदान आहे.
३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे ३.५६ वाजता लातूर मध्ये किल्लारी गावाजवळ ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप आला. या भूकंपाने लातूर आणि धाराशिव (तत्कालीन उस्मानाबाद) जिल्ह्यांतील ५२ गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. सुमारे १२,०००+ लोकांचा मृत्यू झाला, हजारो जखमी झाले, लाखो लोक बेघर झाले. या वेळी विलासराव देशमुख महाराष्ट्र सरकारमध्ये महसूलमंत्री व पालकमंत्री होते.
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी अधिकाऱ्यांना फोनवर झोपेतून उठवत अवघ्या दोन तासांत विलासराव देशमुख व पद्मसिंह पाटील यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली. विलासरावांनी लातूरमध्ये तीन महिने कॅम्प मध्ये मुक्काम ठोकत मदतकार्य बजावले. युनिसेफ आणि इतर संस्थांसोबत समन्वय साधून अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठीही प्रयत्न केले. भूकंपानंतरच्या पुनर्वसन आणि पुनर्बांधणीत विलासराव देशमुख यांचे योगदान अमूल्य ठरले. लातूर जिल्ह्यातील अनेक गावे पूर्णपणे नव्याने उभारली गेली. भूकंप-प्रतिरोधक घरांचे बांधकाम, नवीन रस्ते, पाणीपुरवठा, शाळा-रुग्णालये आणि सार्वजनिक सुविधा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला. वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने पुनर्वसन प्रकल्प राबवले गेले.
किल्लारीच्या भूकंपानंतर उभारलेल्या लातूर आणि आसपासच्या परिसरातील आजरोजीच्या विकासाचे शिल्पकार म्हणून विलासरावांचे नाव अजरामर झाले आहे. विलासरावांनी त्यांच्या कार्यकाळात लातूर शहराला शिक्षणाचे केंद्र बनवले. मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लातूर आणि मुंबईत महाविद्यालये उभारली, ज्यात आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजसारख्या संस्थांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उद्योग आणि सहकार क्षेत्राला चालना दिली. लातूरसारख्या ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने आणि दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन देऊन रोजगार निर्माण केले. प्रसंगी शरद पवार साहेबांचा अंतर्गत विरोध पत्करुन सहकार क्षेत्रात मराठा नेत्यांचे वर्चस्व कायम ठेवण्याचे श्रेय देखील विलासरावांना जाते.
२००६ चे खैरलांजी, २००८ चे २६/११ ताज हल्ला प्रकरण, या दोन प्रकरणांत विलासरावांची भूमिका चुकली. तसे त्यांनी मान्यही केले. ४ डिसेंबर २००८ रोजी 'मी लोकांच्या रोषाला मान देऊन राजीनामा देत आहे,' असे ते म्हणत विलासरावांनी नैतिकता दाखवत राजीनामा दिला. आदर्श घोटाळा प्रकरणात सीबीआयने त्यांच्या मृत्यूपश्चात दोषारोपपत्र दाखल केले मात्र याबाबतीत काहीही ठोस निर्णय झालेला नाही. हे वगळता विलासरावांच्या कारकिर्दीवर बोट दाखवण्याचे धाडस स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेतही नाही. २०१४ ला मोदी लोकसभा प्रचारासाठी लातूर मध्ये गेले होते. तेव्हा विलासरावांना बदनाम करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी हिच्या हत्येचा आरोप काँग्रेस नेतृत्वावर ढकलण्याचे काम मोदींनी केले. तसले चवचाल चाळे करण्यात भाजपा अव्वल आहे.
मृतकेच्या वडीलांना व्यासपीठावर बोलावून न्याय देण्याची घोषणा मोदींनी केली. मोदी केंद्रात १२ वर्षे सर्वशक्तीमान नेते आहेत. याप्रकरणी शून्य कारवाई झाली आहे. अशाप्रकारे लबाडी आणि भामटेगिरी करुन भाजपेयी काँग्रेसच्या विलासरावांच्या कार्याची ओळख कसे काय पुसणार?
विलासराव देशमुख हे लातूरच्या विकासाचे निर्विवादपणे शिल्पकार आहेत आणि राहतील. या तुलनेत रविंद्र चव्हाण यांचे कार्य काय? तर २०१४ नंतर फडणवीसांमुळे हे नाव महाराष्ट्राला समजले. गेल्या ११ वर्षांत दिल्ली ते गल्ली संपूर्ण सत्ता असूनही राज्याचे बांधकाम मंत्री पद मिळूनही, साधे मुंबई - गोवा महामार्गाचे काम त्यांना पूर्ण करता आले नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे माजी मंत्री रामदास भाई कदम यांनी सर्वप्रथम बायकांच्या डोक्यावरील हंडे उतरवले. यानंतर कोकणात मुबलक निधी मंजूर झाला तो माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात! त्यांसही स्थगिती देण्याचे काम भाजपकडून होतेय. असे कर्तृत्ववान (?) रविंद्र चव्हाण विलासरावांच्या आठवणी काय पुसणार? ज्यांना स्वतःच्या केलेल्या कार्याची ओळखच नाही! ते विलासरावांच्या कार्याची ओळख पुसू शकत नाहीत!!
- तुषार गायकवाड
(साभार- सदर पोस्ट तुषार गायकवाड यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)