संघाच्या स्थापनेचं श्रेय म. गांधीं एवढंच डॉ. आंबेडकरांना दिलं पाहिजे - संजय आवटे

The Credit For The Establishment Of The RSS Should Be Given To Dr. Ambedkar As Much As To Gandhi - Sanjay Awate

Update: 2025-10-02 16:06 GMT

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षांचा झाला आहे. आज गांधी जयंती आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनही आहे. या तिन्ही घटनांचा परस्परांशी खूप जवळचा संबंध आहे. कोणी काही म्हणो, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे श्रेय महात्मा गांधींना दिले पाहिजे. तेवढेच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही दिले पाहिजे.

१९१५मध्ये गांधी आफ्रिकेतून भारतात परतले. त्यांचे गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना सल्ला दिला की, तुला काही बदल घडवायचा असेल, तर त्यासाठी भारत बघितला पाहिजे. आणि, भारत बघायचा असेल तर भारतभर फिरलं पाहिजे. गांधी चालत राहिले. भारत बघत राहिले.

त्यानंतर १९१६मध्ये काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात गांधी पहिल्यांदा सहभागी झाले. तेव्हा, काँग्रेसमध्ये टिळकयुग सुरू होते. एवढे असूनही लोकमान्य टिळकांना काँग्रेसचे अध्यक्षपद कधीच मिळू शकले नाही. तसा प्रयत्न त्यांनी अनेकवेळा करून पाहिला. मात्र, प्रत्येकवेळी ते अपयशी झाले. १९०७मध्ये सुरतच्या अधिवेशनात तर सर्व बळ एकवटून त्यांनी तो प्रयत्न केला. मात्र, शक्य झाले नाही.

१९१६मध्ये महात्मा गांधी पहिल्यांदाच काँग्रेस अधिवेशनाला उपस्थित राहिले. त्यानंतर अल्पावधीत मोहनदास करमचंद गांधी हे नाव काँग्रेसमध्ये महत्त्वाचे झाले. चंपारण्य सत्याग्रह १९१७चा. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणातील गांधींचे महत्त्व अधिकच वाढले. अवघ्या दोन-तीन वर्षातच गांधी एवढे महत्त्वाचे नेते झाले की, टिळकांच्या समर्थकांना चिंता वाटू लागली. गांधींचा प्रभाव संपवायचा असेल, तर लोकमान्य टिळकांना काँग्रेसचे अध्यक्ष केले पाहिजे. त्यांच्या समर्थकांनी हे मनोमन ठरवून टाकले.

१९२० मध्ये काँग्रेसचे अधिवेशन नागपूरला होणार होते. या अधिवेशनात लोकमान्यांना अध्यक्ष करायचे, असे यांचे जवळपास ठरले होते. टिळकांचे कट्टर समर्थक बी. एस. मुंजे आणि मुंजेंचे शिष्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा त्यासाठी पुढाकार होता. अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारीही प्रामुख्याने या दोघांकडे होती. मात्र, अधिवेशनापूर्वीच लोकमान्यांचे देहावसान झाले. त्यामुळे टिळकांना अध्यक्ष करण्याची त्यांच्या समर्थकांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. १९२०च्याच या अधिवेशनाने महात्मा गांधींचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. काँग्रेसमध्ये आता ‘गांधीयुग’ सुरू झाले आहे, याची खात्री सर्वांना पटली. पूर्ण अधिवेशनावर प्रभाव होता तो गांधींचा. टिळक समर्थकांना त्याचा ज्याप्रमाणे त्रास होता, तसाच बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनाही होताच. याच नागपूर अधिवेशनात जिनांना अपमानास्पद प्रसंगाला सामोरे जावे लागले. ते बोलत असताना लोकांनी त्यांना जोरजोरात ओरडून गप्प केले. एका वादाच्या प्रसंगी जिनांनी गांधींना ‘महात्मा’ म्हणून संबोधण्यास नकार दिला आणि ते वारंवार फक्त ‘मिस्टर गांधी’ असेच म्हणत राहिले. लोक भडकले. अखेरीस परिस्थिती शांत करण्यासाठी स्वतः गांधींनाच मध्यस्थी करावी लागली.

१९२० च्या याच अधिवेशनात महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित करण्यात आली होती. मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सरोजिनी नायडू त्यासाठी उपस्थित होते. टिळक आणि गांधी यांच्यातील फरक इथे लक्षात येतो. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी लोकमान्य टिळकांविषयी एक आठवण त्यांच्या आत्मकथनात दिली आहे. पुण्यातील अस्पृश्यता निवारण परिषदेत लोकमान्य टिळकांनी भावना उचंबळून टाकणारे भाषण केले. “अस्पृश्यता ही देवाला मान्य असेल, तर मला तो देव मान्य नाही.“ लोकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला. दुसर्‍या दिवशी विठ्ठल रामजींनी “मी माझ्या खासगी आणि सार्वजनिक जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही” अशा आशयाचे पत्रक तयार केले. परिषदेतील सर्व नेत्यांच्या सह्या घेऊन ते प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार होता. टिळकांना पत्रक दाखवले आणि सही करण्याची विनंती केली. टिळक विठ्ठलरावांना बाजूला घेऊन गेले आणि त्यांनी सही केली नाही. “शिंदे मला आताच याच्यावर सही करता येणार नाही. मला माझ्या सहकार्‍यांना विचारावे लागेल..!”

१९२० हे वर्ष आणखी महत्त्वाचे आहे. अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी आयोजित केलेली महत्त्वाची माणगाव परिषद तेव्हा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांनी क्रांतिकारी कार्यक्रम जाहीर केला. बाबासाहेब हेच अस्पृश्यांसह सर्वांचे नेते आहेत, असे खुद्द राजर्षींनी जाहीरपणे सांगितले. राजर्षी आणि टिळक यांच्या संबंधांविषयी काय सांगावे! एकूणच, हिंदुत्वाच्या कर्मठ मांडणीला हा तडाखा होता.

गांधी आल्यानंतर काँग्रेसची दिशा बदलणार आहे, याचा अंदाज अनेकांना आला होता. १९१६च्या लखनौ अधिवेशनात नेहरू प्रथमच गांधींना भेटले. सुरुवातीला ते गांधींविषयी साशंक होते. त्यानंतर मात्र नेहरूंवरील गांधींचा प्रभाव वाढत गेला. आणि, त्यांच्यामध्ये दृढ नाते तयार झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला गांधींना सुनावले, पण त्यानंतर गांधींचे महत्त्व त्यांच्याही लक्षात येत गेले. बाबासाहेबांनी १९२०मध्ये ‘मूकनायक’ सुरू केले. सुरुवातीला महात्मा गांधींबद्दल कडक शब्दात बोलणारे आंबेडकर ‘मूकनायक’मधून गांधी विचार प्रकाशित करू लागले. नंतर हे संबंध ताणले गेले आणि संविधानाच्या चौकात पुन्हा दोघे एकत्र आले!

काँग्रेसमधील महात्मा गांधींच्या उदयामुळे आता आपले काही चालणार नाही, हे मुंजे-हेडगेवार आणि मंडळींच्या लक्षात येत गेले. काँग्रेसमध्ये कट्टर हिंदुत्ववादी असा मोठा गट होता. हे हिंदू राष्ट्र आहे, असे ठामपणे सांगणारा तो गट होता. गांधींच्या अहिंसा आणि धर्मनिरपेक्षता या दोन्ही मूल्यांना त्यांचा विरोध होता. गांधींना विरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला, मात्र गांधींचे महत्त्व वाढतच गेले. १९२४ मध्ये गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर या गटाने हार मानली. याच गटाने पुढे १९२५मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला. हिटलर आणि मुसोलिनी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रभाव होता. बी.एस. मुंजे स्वतः मुसोलिनीला इटलीमध्ये जाऊन भेटले. लष्करी शिस्तीतच देशाची प्रगती होऊ शकते. अहिंसेला काही अर्थ नाही, अशी त्यांची धारणा होती. या देशाला ‘हिंदू राष्ट्र’ करण्याचा त्यांचा निर्णय पक्का होता. या सगळ्यांमध्ये महात्मा गांधी हा मुख्य अडसर होता. गांधींना विरोध करण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला आणि काँग्रेसमध्ये गांधीपर्व सुरू झाल्यामुळेच तो स्थापन करावा लागला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपूर्वी हिंदू महासभा होती. १९१५मध्ये हिंदू महासभा स्थापन झाली. मुस्लिम लीग स्थापन झाल्यानंतर आणि मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेल्यानंतर हिंदूंची स्वतःची संघटना असावी, अशी मागणी १९०९पासून जोर धरू लागली होती. त्यातून हिंदू महासभेचा जन्म झाला. ज्या मुस्लिम लीगला विरोध करण्यासाठी हिंदू महासभा स्थापन झाली, त्या हिंदू महासभेने पुढे मात्र प्रांतिक निवडणुकांमध्ये मुस्लिम लीगशी हातमिळवणी केली. १९३७ च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने प्रचंड विजय मिळवला आणि हिंदू महासभा जवळजवळ नामोहरम झाली. मात्र १९३९ मध्ये, भारतीय जनतेचा सल्ला न घेता इंग्लंडने भारताला दुसऱ्या महायुद्धात सहभागी राष्ट्र म्हणून घोषित केले. याच्या निषेधार्थ काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. यानंतर हिंदू महासभेने मुस्लिम लीग आणि इतर पक्षांसोबत हातमिळवणी करून काही प्रांतांत आघाडी सरकारे स्थापन केली. अशी आघाडी सरकारे सिंध, बंगालमध्ये स्थापन झाली.

हिंदू महासभेचा अंतर्विरोध इथेच संपत नाही. एकीकडे अखंड हिंदुस्थान, हे आमचे स्वप्न आहे, असे म्हणणार्‍या हिंदू महासभेने, संस्थाने भारतामध्ये सामील होऊ नयेत, अशी भूमिका घेतली. प्रामुख्याने मैसूर, त्रावणकोर, बडोदा अशी जी हिंदू संस्थाने आहेत, त्यांनी आपले हिंदूपण कायम ठेवावे आणि भारतात सामील होण्याच्या फंदात पडू नये, अशी अधिकृत भूमिका हिंदू महासभेने घेतली होती. हिंदू महासभेला या संस्थानांकडून आर्थिक मदत मिळत असे आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरही ती संस्थाने स्वतंत्र राहावीत, यासाठी महासभेने त्यांना पाठिंबा दिला. सावरकरांनी तर या संस्थानांना ‘हिंदू सामर्थ्याचा पाया’ असे संबोधले.

गांधी आणि नेहरूंना फाळणीसाठी जबाबदार मानणारी एक टोळी आहे. मात्र, हिंदू आणि मुस्लिम असे दोघेही एका देशात राहू शकत नाहीत. ते स्वतंत्र दोन देश आहेत, असा द्विराष्ट्र सिद्धांत बॅरिस्टर जिना यांनी मांडला. तोच सावरकरांनी उचलून धरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या संदर्भात म्हणतात, ‘हे विचित्र आहे, पण खरे आहे. सावरकर आणि जिना हे एक राष्ट्र विरुद्ध द्विराष्ट्र या प्रश्नावर परस्परविरोधी नसून पूर्णपणे एकमताने एकमेकांसोबत उभे राहतात. भारतात दोन राष्ट्रे आहेत. एक मुस्लिम राष्ट्र आणि दुसरे हिंदू राष्ट्र, यावर ते दोघे केवळ सहमतच नाहीत. तर त्याबद्दल ते ठाम आग्रहही धरतात.' या दोन प्रवाहांमुळेच भारताची फाळणी करणे इंग्रजांना शक्य झाले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदू महासभा अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कुठेही नव्हते. आरएसएसने स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हायला विरोध केला. उलटपक्षी या संघटनेने ब्रिटिश वसाहतवादी सत्तेशी सहकार्याची धोरणे स्वीकारली. काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला, तोही यांना मान्य नव्हता. लाहोरमध्ये रावी नदीच्या किनारी झालेल्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला. आणि, त्यानंतर २६ जानेवारी १९३० रोजी देशभर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. २६ जानेवारीला भारतभर सगळ्यांनी तिरंगा फडकवला. संघाने मात्र या निर्णयाला विरोध केला. सगळीकडे भगवा झेंडा फडकवण्याचा आदेश संघाने अधिकृतपणे दिला. त्यानंतर तर भगवा काय आणि तिरंगा काय, या दिवशी कुठलाही झेंडा न फडकवण्याचा निर्णय संघाने घेतला. आरएसएसने सुरुवातीला तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्य केला नव्हता. संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ने संपादकीयामध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून भगवा ध्वज स्वीकारावा, अशी मागणी केली होती. तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृती दिली गेल्यानंतर, ‘ऑर्गनायझर’ने तिरंग्यावर आणि त्या निर्णयावर तीव्र टीका केली.

एवढेच काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवातीला भारतीय राज्यघटनेलाही मान्यता दिली नव्हती. राज्यघटनेत मनुस्मृतीतील 'महर्षी मनूंचे कायदे' यांचा उल्लेखच नाही, अशी त्यांची टीका होती. राज्यघटना अंतिम झाल्यानंतर, संघाचे मुखपत्र असलेल्या याच ‘ऑर्गनायझर’ने ३० नोव्हेंबर १९४९ च्या अग्रलेखात म्हटले होते- "आपल्या राज्यघटनेत प्राचीन भारतातील विलक्षण घटनात्मक परंपरांचा उल्लेखच नाही. मनुस्मृतीत मांडलेल्या कायद्यांचे कौतुक जग करत आहे. पण आपल्या घटनाकारांना त्याचा अर्थ समजत नाही." भारतीय राज्यघटनेपेक्षा ‘मनुस्मृती’ महत्त्वाची, असेही एका लेखात म्हटले होते. ‘डॉ. आंबेडकर यांनी ‘मनूचे दिवस संपले’ असे म्हटले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, हिंदूंचे दैनंदिन जीवन आजही ‘मनुस्मृती’ आणि इतर स्मृती यातील तत्त्वे व आदेश यावरच सुरू आहे. अगदी परंपरा न पाळणारा हिंदूदेखील काही बाबतीत तरी स्मृतीतील नियमांनी स्वतःला बांधलेले मानतो', असे संघाचे मुखपत्र म्हणते. आणि, आंबेडकर-नेहरूंवर जोरदार हल्ला चढवते.

डॉ. बाबासाहेबांनी राजर्षी शाहू महाराजांना सोबत घेऊन माणगाव परिषद केली. त्यानंतर ‘मनुस्मृती’ जाळली. राज्यघटना लिहून कायद्याची नवी भाषा दिली. गांधी-नेहरू-पटेलांच्या खांद्याला खांदा लावून बाबासाहेब उभे ठाकले. बाबासाहेब ध्वज समितीवरही होते. त्यांनीच तिरंग्यावर शिक्कामोर्तब केले. आणि, नागपुरातच बाबासाहेब लाखो अनुयायांना घेऊन बुद्धांच्या वाटेने निघाले.

१९२०मध्ये टिळकांचे देहावसान. १९२० मधील नागपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनातील गांधीपर्वाची झलक. १९२०मधील ऐतिहासिक माणगाव परिषद. १९२० मध्ये सुरू झालेल्या ‘मूकनायक’मधील क्रांतिकारी भाषा. यामुळे संघाच्या स्थापनेची निकड भासू लागली. १९२४मध्ये गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले आणि मग तर ती तातडीची गोष्ट झाली. आणि, शंभर वर्षांपूर्वी संघ स्थापन झाला. त्यामुळेच कदाचित संघासाठी गांधी प्रातःस्मरणीय आहेत!

गंमत बघा.

१९२०मधील नागपूर अधिवेशनात गांधींना विरोध करत बॅ. मोहम्मद अली जिनांनी कॉंग्रेस सोडली. त्यानंतरच मुंजे आणि हेडगेवारांनीही कॉंग्रेस सोडली. धर्माच्या पायावर उभ्या राहिलेल्या संघटनांच्या दिशेने त्यांचा प्रवास झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथेच देशाला बुद्धांची नवी वाट दाखवली!

सौजन्य - संजय आवटे फेसबूक पेज

Tags:    

Similar News