वैष्णवीच्या खुनाच्या निमित्ताने... या प्रश्नावर असणारा उपाय बाळबोध नाही ना हे गणित एक अधिक एक दोन इतक सोप आहे. हा प्रश्न आपल्या समाज म्हणून असणाऱ्या मानसिकतेचा आहे. संपूर्ण भारतात एखाद्या व्यक्तीच्या यशस्वी होण्याचे निकष काय आहेत ?
पुरुषाने जन्माला येणे, शिक्षण घेणे, नोकरी किंवा व्यवसाय करून पैसे मिळवणे, देवधर्म करणे , घर बंगला गाडी घेणे आणि पोर जन्माला घालणे. स्त्रीने जमेल तेवढ शिक्षण घेणे, बाप सांगेल त्याच्या गळ्यात हार घालणे, त्याची भांडीकुंडी करणे आणि पोरांना जन्म देणे. सहा महिने काम करून सहा महिने सोलो ट्रॅव्हलर म्हणून जग फिरणार म्हटल तर लोक तुम्हाला बेजबाबदार, आईबापाची काळजी नसलेले पोरं म्हणतात.
भारतीय कुटुंबव्यवस्था, संस्कृती चांगली कि वाईट हा मुद्दाच नाहीये. कुठलीही व्यवस्था कालसुसंगत नसेल , कुठलीही संस्कृती प्रवाही नसेल तर तीच डबक होऊन ती सर्वनाश करते. आधुनिक जगात म्हणजे १९०० नंतर भारताने पाश्चिमात्य देशांकडून बरच काही घेतल.कपडे , लाइफस्टाइल , खानपान. महत्वाच्या गोष्टी मात्र घेतल्याच नाहीत.
पाश्चिमात्य देशात जमीनजुमला सोनंनाणं हे पुढच्या पाच पन्नास पिढ्यासाठी कुणी जमवत नाही.१८ वर्षाच्या आगेमागे पोरांना आपापल्या उद्योगाला जुंपून दिल जात. पोर शिकून काम करतात किंवा काम करत शिकतात, स्वावलंबी होतात, आर्थिक निर्णय घ्यायला शिकतात.
आपल्याकडे पदवी होईपर्यंत शिक्षण आईबापानी करायचं, तिथून पुढेही आणखी शिकायला पैसे द्यायचे, त्यापुढे जाऊन नोकरी धंद्याला मदत करायची. पोरगी असेल तर लग्न लावून द्यायचं. हे सगळं करायला आईबाप जगण विसरून फक्त अपत्यांच्या भविष्याची व्यवस्था करायला जीव काढून मरतात.
अर्थशास्त्र बचतीच्या अंगाने काहीही सिद्धांत मांडत असेल तरीही आयुष्यभर दातांच्या कण्या करून पोट भरून पैसे कमवायचे आणि म्हातारपणी ती मालमत्ता आपण स्वतः उपभोग न घेता पोरांना सोपवून मोकळं व्हायचं ही भारतीयांची मानसिकता आहे.
मुलांना स्वावलंबी न बनवण्याचे परिणाम मग मुलांवर केलेला खर्च लग्नात वसूल करण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यात होतात. पाश्चिमात्य देशातली आणखी एक गोष्ट आपल्याला पचवता आलेली नाही.
नवरा बायको लग्न करतात, पोरांना जन्म देतात मात्र जर पुढ जाऊन वाटा वेगळ्या होण्यापर्यंत गोष्टी गेल्या तर दोघेही स्वावलंबी असल्याने ‘पोरांसाठी पाय अडकतो’ म्हणून कुणी लोढण गळ्यात बांधून मनाविरुद्ध प्रपंच करत नाहीत. एकाच घरात बापाची पोरं, आईची पोरं आणि आईबापाची पोरं राहण्याची गोष्ट पाश्चिमात्य देशात अशक्य नाहीये.
आपल्याकड लेकरं झाली कि बाईचा पाय घरातून निघत नाही, मारझोड झाली तर मुलांचं काय होईल या दबावाने ती तिथचं सहन करत राहते किंवा घराबाहेर पडले तर आईबापाला काय वाटेल, लोकं काय म्हणतील या लाजेने अत्याचार सहन करते.
भारतीय कुटुंबव्यवस्था माणसाना जोपर्यंत आधार असते तोपर्यंत सुसह्य असते. पण कुटुंबांची प्रतिष्ठा, फुकाचा मानसन्मान या नावाखाली कुटुंबात व्यक्तीचा कोंडमारा होणार असेल, अत्याचार सहन करावे लागणार असतील तर हीच कुटुंबव्यवस्था पायातल्या बेड्या बनून राहते.
हुंड्याची मागणी याच व्यवस्थेत सामान्य समजतात. पोराचे आईबाप पोराच्या शिक्षणावर केलेला खर्च ‘वसूल’ करण्याच्या उद्देशाने पोराची विक्री करतात. पोरींचे आईबाप आपली मुलगी कितीशी शिकलेली असली तरीही तिच्यासाठी जावई विकतच घेतात.
साक्षर, शिक्षित असणारा माणूस आणि सुशिक्षित असणारा माणूस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे उच्चविद्याविभूषित म्हणवले जाणारे जेव्हा अशा अमानुष अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी म्हणून समोर येतात तेव्हा लोकांना धक्का बसतो पण तिथेच साक्षर आणि सुशिक्षित हा फरक समजतो.
या प्रश्नावर कुणीतरी मुलामुलींनी लग्नानंतर आईबापांना वेगळ ठेवून राहावे असा सल्ला दिला. हा तद्दन भाबडा आणि अव्यवहारिक पर्याय आहे. क्षणक्षण काय घडतं समजण्याची सोय असताना जर नवरा बायको वेगळे राहिले आणि तरीही लांब राहणाऱ्या कुटुंबाने त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ केली कि कुणाला उचकवून दिल तर तुम्ही काय करणार आहात ?
या सगळ्या प्रश्नाच्या गाभ्याशी असणारी गोष्ट, समाज म्हणून, कुटुंबव्यवस्था म्हणून आपल्यात कालानुरूप अपेक्षित असणारे बदल न होणे आणि आपण शरीराने एकविसाव्या शतकात पण मनाने रानटी मध्ययुगीन काळात असणे आहे.
बाई पायाची दासी आहे,
पायातली वहान डोक्यावर घेऊ नये,
मुलीनी शिकून काय करायचं आहे ?
नवरा बाहेरून आला कि त्याच्या हातात चहाचा कप दिला पाहिजे,
बाईचा पदर डोक्यावरून मागे जाता कामा नये ,
टिकली, कुंकू आणि बरच काही,
आईबापानी जिथं उजवली तिथं जाताना पालखीत गेलीस, येताना तिरडीवर ये असले डायलॉग हे अजूनही एकविसाव्या शतकात चालणार असेल आणि बिनडोक मठ्ठ बायका आणि पुरुष त्यालाच संस्कृती म्हणून त्याचा उदोउदो करणार असतील तर आपण चुकतोय कुठ हे आपण कधी पाहणार ?
कुठल्याही मार्गाने मिळवलेले पैसे कुठ खर्च करायचे हा प्रश्न असणाऱ्या धनदांडग्यांच्या झुंडी आणि टोकाची गरिबी हि असमानता असताना जितकं मोठं लग्न तेवढा माणूस मोठा हे बिनडोक गृहीतक आता मराठा समाजासोबत सगळीकड रुजलेलं आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणजे नातेवाईक पाहुण्यात एखाद्याने दणक्यात लग्न केल कि तोच बेंचमार्क होतो. मग तेवढ किंवा त्याहून मोठ लग्न करण्याची इर्षा सुरु होते.त्यासाठी वाट्टेल त्या मार्गाने पैसा कमवण्याची स्पर्धा सुरु होते.
मुलांची-मुलींची जडणघडण त्याच वातावरणात होत असल्याने त्यांना या पैशासाठी काय करावं लागतं किंवा मुद्दलात हे सगळं चूक आहे, अशी उधळपट्टी चुकीची आहे याचीच जाण नसते. माझं लग्न एकदाच होणार आहे मग होऊ दे कि हौस असं म्हणणं किंवा अमक्याने लग्नात असा खर्च केला मग मी का मागे राहू असा विचार मनात येणे हे शुद्ध अडाणीपणाचे आणि अशिक्षित असण्याचे लक्षण आहे हेही पोरांना कळत नाही.
आईबापानी कष्टात दिवस काढलेले असतील तर त्यांनी मुलांना संगोपन करताना वेळ देण अपेक्षित असत ते होत नाही साहजिकच नंतर वेळेची भरपाई पैशाने केली जाते आणि मग मुलांना टंचाई, शेअरिंग या गोष्टी माहितीच होत नाहीत. मुलांवर करण्याचे संस्कार समोर बसवून होत नसतात तर मुल आईबापाला बघूनच शिकतात. हजार कायदे करा, दहा हजार भाषणे द्या, पत्रक काढा, मोर्चे काढा. या सगळ्यातून लोक पळवाटा काढणारच.
याला असणारा उपाय दीर्घकालीन आहे आणि तो स्वतःच्या घरापासून आहे. मुलांना फक्त साक्षर न करता सुशिक्षित करणे, चांगल्या वाईटाची ओळख करून देऊन माणुसकीची बेसिक मूल्य रुजवणे. माणूस म्हणून इतरांच्या मनाचा, हक्काचा, स्वातंत्र्याचा विचार करायला शिकवणे, जोडीदार निवडताना भावना आणि बुद्धी दोन्हीचा वापर करायला शिकवणे, मुलांना स्वावलंबी करून त्यांना त्यांची संपत्ती स्वतः निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणे, पालक म्हणून मुलांच्या प्रपंचावर मार्गदर्शक म्हणून लक्ष ठेवणे, मात्र त्यांच्या प्रपंचात तोंड खुपसणे टाळणे, आणि सगळ्यात महत्वाचं आपण, आपला जोडीदार आणि आपली अपत्य हे आपल कोअर कुटुंब असतं. त्याच सुख, समाधान, आनंद हि आपल्यासाठी जगातली सगळ्यात महत्वाची बाब असते. त्यासाठी संपूर्ण जगाला ,समाजाला , तथाकथित चार लोकांना कोलण्याची क्षमता आणि तयारी असावी.
या कोअर कुटुंबात कुणीही चुकल, निर्णय चुकला तरीही समजून घेऊन घराचे दरवाजे उघडे ठेवून आपल माणूस पुन्हा आपल्या कुटुंबात सामावून घेण्याची नियत, क्षमता आणि बुद्धी असावी.
जगात काहीही आदर्श नसत.
ना कुठला देश,
ना कुठला समाज,
ना कुठली संस्कृती,
ना कुठली कुटुंबव्यवस्था ,
ना कुटुंब,
ना व्यक्ती.
जितक चांगल आपल्याला करता येईल, जास्तीतजास्त अचूक निर्णय घेता येईल याचा प्रयत्न आपण करतो पण उद्या आपल्या अपत्यांचा निर्णय चुकला तरी चुकलेला निर्णय बळच रेटायला लावू नका. निर्णय तू घेतलास आता तुझा तू निस्तर अस म्हणू नका, पोटचा गोळा आहे, कोअर कुटुंबाचा भाग आहे. चूक दुरुस्त करून पुढे कस जाता येईल ते पहा.
तुमच्या फुकाच्या मानसन्मान आणि प्रतिष्ठा यासाठी नात्यांचा, माणसांचा, अपत्यांचा बळी देण्याइतका गाढवपणा दुसरा कोणताही नाही.