Rupee historic low : चलनाचं राजकारण हे शोषणाचं थेट साधन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

रुपया घसरला की कोणाचे खिसे भरतात? चलनाची स्थिरता आणि अस्थिरता यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते? रुपयाची ऐतिहासिक घसरण यावर हितेश पोतदार यांचा महत्त्वपूर्ण लेख...

Update: 2025-12-04 10:21 GMT

आज पुन्हा एकदा रुपया ऐतिहासिक नीचांकीवर पोहोचला आहे. हे वाचतांना मला लंडनमध्ये बसून बातमीचे महत्व अधिक जाणवत असते आणि आंबेडकरांचा 'The Problem of Rupee' निबंध सारखा आठवत असतो. बाबासाहेबांनी तो लंडन मध्ये बसूनच का व कसा लिहिला असावा हेही कळते.

जागतिक असमानता दैनंदिन खर्चातून कशी दिसते याचं जिवंत उदाहरण अनुभवायला मला मिळालं आहे. लंडनमध्ये राहून जेव्हा आपण जागतिक दक्षिणेकडील किंवा युरोपातीलही इतर तुलनेत कमकुवत देशांत जातो तेव्हा पाउंडची ताकद रोजच्या छोट्या खरेदीतही जाणवते. जसे कॉफी, मेट्रो, जेवण, हॉटेल आणि सर्व काही सहज परवडणारं.

पण गेल्या वर्षी मी इस्तंबूलला एका अकादमिक कॉन्फरन्सला गेलो तेव्हा भारताहून थेट आलेल्या काही भारतीय मित्र-मैत्रिणींसाठी तो प्रवास कसा अतीव महाग होता हे कळलं. तुलनेत मी पाउंड्सला कन्व्हर्ट करून खर्चित असल्याने मला इस्तंबूल फारच स्वस्त पडलं. तेच शहर, तीच हॉटेल्स, तोच खर्च. पण चलनामुळे सामान्य माणसाचं जग किती एका क्षणात कसं बदलतं हे दिसलं. त्यामुळे चलन व त्यातील चढ-उतार हे केवळ अर्थशास्त्रीय संकल्पनांचे फक्त चर्चेसाठीचे निर्जीव स्वरूप किंवा शासकीय टूल म्हणून उरत नाही. तर ते जागतिक सत्तासंबंधांचं राजकारण आपल्यासमोर उघड करते.

डॉ आंबेडकर आणि रुपया : आजही तितकेच समर्पक :

बाबासाहेबांनी The Problem of the Rupee मध्ये ब्रिटिश राजवटीची जी राजकीय अर्थव्यवस्था उलगडली, ती आजही आपल्या समोर होती तशीच आजही उभी आहे. फक्त तिची स्वरूपं बदलली आहेत.

१) साम्राज्याचं नातं म्हणजे आर्थिक शोषण

बाबासाहेब स्पष्ट सांगतात की भारतावरचं ब्रिटिश राज्य हे 'उपकारक' नव्हतं. तर ते एक निखळ परकीय सर्वाधिकारशाहीचं वास्तव होतं. East India Company हा फक्त आडोसा होता प्रत्यक्षात मात्र भारत सरकार हे ब्रिटिश साम्रजाचाच एक विभाग होता जिथून जास्तीत जास्त नफा कमावला जाई. त्यामुळे प्रत्येक आर्थिक निर्णय 'भारताच्या हितासाठी' नसून ब्रिटनच्या हितासाठी घेतला जात होता.

२) Drain of Wealth

१९व्या शतकात भारतातून ब्रिटनकडे दरवर्षी पेंशन, सैन्य, कर्ज, ‘होम चार्जेस’ मार्फत सुमारे १० कोटी ब्रिटिश पाउंड एवढा निःपरतावा वाहत होता! भारत गरीब, ब्रिटन श्रीमंत होत होता. आंबेडकर म्हणतात भारत हा जगातील 'सोन्या–चांदीचा एक सिंक' बनला होता.




रुपया म्हणजे साम्राज्यवादाचं शस्त्र

आज आपण रुपयाच्या घसरणीकडे एक बाजरीय क्षुल्लक घटना म्हणून पाहतो. पण आंबेडकर दाखवतात की, चलनाचं राजकारण हे शोषणाचं थेट साधन असतं.

१) चांदीपासून Gold Exchange Standard म्हणून निवडणे जे भारताच्या नव्हे तर इंग्लंडच्या सोयीसाठी केले गेले. चांदीची किंमत घसरल्यानंतर (१८७३), 'होम चार्जेस' सोन्यात द्यावे लागत असल्याने ब्रिटनला अडचण आली. त्यावर उपाय म्हणून ब्रिटनने १८९३ ला भारतीय टांकसाळ बंद केले. रुपयांची कृत्रिम टंचाई निर्माण केली. आणि म्हणून रुपयाची किंमत वाढवली. पण भारताच्या सोयीसाठी नव्हते तर ब्रिटनला चलनव्यवस्थापन सोयीचं जावं म्हणून.

२) 'व्यवस्थापित चलन' म्हणजे Imperialismची मनमानी

आंबेडकर म्हणतात Gold Exchange Standard ला स्वतःची स्थिरता नसते. ही सरकारच्या मनाप्रमाणे चालणारी पद्धती आहे. चलन पुरवठ्याला मर्यादा नसली तर महागाई, अस्थिरता आणि सर्वात जास्त नुकसान गरीबांचंच.

३) रुपया घसरला की कोणाचे खिसे भरतात?

रुपया घसरला की देशांतर्गत किंमती वाढतात त्याने उद्योजकांच्या नफ्यात भर पडते. परंतु कामगारांचे वेतन त्या वेगाने वाढत नाही. म्हणून ह्यातून थेट व सर्वाधिक नुकसान श्रमिकांचं होतं.

बाबासाहेबांच्याच शब्दात: “कमी दराचा फायदा हा एका वर्गाचा असतो, जो दुसऱ्या वर्गाच्या खर्चातून मिळतो.” हे गरीबांच्या खिशातून केलेल्या “गुप्त चोरीचं” धोरण आहे.

__________________________________

आजचा ९०+ रुपया आणि आंबेडकरांचा इशारा:

रुपया पडल्यावर—

• भारतातील प्रवास, शिक्षण, आयात महाग होते.

• भारतीयांची जागतिक क्रयशक्ती कमी होते.

• ब्रिटनसारख्या देशात राहणाऱ्यांना जग “स्वस्त” दिसतं. ह्या काळातच रुपया दरवर्षी पडतो कारण इकडच्या देशांत तीव्र हिवाळा असतो. ह्याच काळात गोरी लोक पर्यायाने व तुलनेत कमी थंड प्रदेशात फिरायला निघतात. हे प्राथमिक कारण नसले तरी असाही त्यांना फायदा होतो.

• भारतातून प्रवास करणाऱ्यांसाठी तेच जग अतिशय टोकाचं महाग वाटतं.

हे फक्त अर्थशास्त्र नाही. हे औपनिवेशिक वारशाचं उरलेलं सावट आणि नव-साम्राज्यवादाचं नवं-विकसित रूप आहे.

डॉ. आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी सांगितलेलं सत्य आजही तितक्याच प्रखरतेनं आपल्या समोर उभं आहे. म्हणूनच, चलनाची स्थिरता ही गरीबांच्या संरक्षणाची सामाजिक जबाबदारी आहे. आणि अस्थिर रुपया म्हणजे श्रमिक आणि गरीबांचा खिसा कापून केलेली चोरी आहे.

हितेश पोतदार

hiteshdpotdar@gmail.com

( लेखक गेल्या सात वर्षांपासून अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्याचे काम करत आहे. तसेच कामगार अभ्यासाचा व्यापक असा त्यांचा अनुभव आहे.)

Similar News