पन्नालाल भाऊंना पुरस्कार माझ्या हस्ते! हे ऐकून मी चक्क चक्रावून गेलो - शमसुद्दिन तांबोळी
"शमु, मी पुण्यात आलोय. तुला जमेल तेव्हा भेटायला ये." भाऊंचा असा फोन आता येणार नाही. हा विचार खूप अस्वस्थ करतो. मरणोत्तर देहदान करून भाऊंनी ऐहिक जीवन अधिक समृद्ध केले. वाचा शमसुद्दिन तांबोळी यांचा लेख
तुला जमेल तेव्हा भेटायला ये...
मुस्लीम सत्यशोधक मंडळाबद्दल विशेष आस्था असणार्या (पन्नालाल सुराणा) भाऊंनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या कामात सहाय्यभूत ठरावे म्हणून कायदेतज्ज्ञ, इस्लामचे अभ्यासक, हमीद दलवाई यांचे स्नेही मा. असफ ए ए फैजी यांच्या Reforms in Muslim Personal Law या पुस्तकाचे "मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील सुधारणा" हे पुस्तक अनुवाद करून प्रकाशित केले.
मागील वर्षी भाऊंना मराठवाडय़ातील एका प्रतिष्ठित संस्थेने 50,000 रूपयांचा समावेश असलेला पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. या पुरस्काराची संपूर्ण रक्कम त्यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळास देणगी स्वरूपात स्वतःचा धनादेश आणि सात आठ ओळीचे पत्र लिहून पाठवले.
चार वर्षांपूर्वी हमीद दलवाई जयंतीनिमित्त नळदुर्ग येथील "आपले घर" येथे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर आयोजित केले होते. या दोन दिवसातील प्रत्येक सत्रात उपस्थित राहत. मंडळाच्या कार्यकर्त्यांना मिळालेला चालत्याबोलत्या अस्सल समाजवादी भाऊंचा हा सहवास अविस्मरणीय तर आहेच शिवाय कार्यकर्त्याने किती निरपेक्ष असावे याचे उदाहरण देणारा होता.
काही वर्षापूर्वी बार्शी येथील मामासाहेब जगदाळे शिक्षण संस्थेने मा.पन्नालाल सुराणा यांना "समाज परिवर्तन" पुरस्कार घोषित केला. त्यावेळेस आयोजकांनी भाऊंना सांगितलं की, आपले वय आणि कार्य लक्षात घेऊन आपणास हा पुरस्कार देण्यासाठी कोणाला बोलवावे, असा आम्हाला प्रश्न पडलाय. तुम्हीच एखादं नाव सुचवाल का ? तेव्हा भाऊंनी आयोजकांना सांगितले की, शमसुद्दिन तांबोळी येतात का पहा. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार घ्यायला मला आवडेल. भाऊनीच आयोजकांना माझा फोन नंबर दिला. आयोजकांनी मला फोन केला आणि या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे निमंत्रण दिले. भाऊंना पुरस्कार माझ्या हस्ते! हे ऐकून मी चक्क चक्रावून गेलो. माझ्यासाठी हा आनंदित करणारा जेवढा क्षण होता त्यापेक्षा कितीतरी पटीत संकोचाची भावना देणारा होता. भाऊंच्या पुढे मी खूपच खुजा असणारा कार्यकर्ता असल्याचे मी त्यांना सांगितले. माझ्या हस्ते भाऊंना पुरस्कार देणे याची मी कल्पनाच करू शकत नव्हतो. परंतु आयोजकांनी मला सांगितले की ही भाऊंचीच इच्छा आहे, त्यांनीच फोन नंबर दिला आहे.
आपण वेळ काढून यावं अशी आमची विनंती आहे वगैरे. भाऊंच्या या सत्कार समारंभावेळी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. मंचावर आणि समोर खासदार, आमदार, संस्थाप्रमुख आणि अनेक प्रतिष्ठित मान्यवर होते. भाऊंनी हा पुरस्कार माझ्या हस्ते स्वीकारून मला फार मोठे केले. नवे कार्यकर्ते, परिवर्तनाचा नवा विचार समाजासमोर यायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे ही भाऊंची प्रामाणिक भावना.. भाऊंना असे कितीतरी पुरस्कार आणि सन्मान मिळाले असल्याने त्यांच्यासाठी हा पुरस्कार मोठा नव्हता पण माझ्यासाठी भाऊंनी केलेला हा माझा मोठा गौरव होता.
मध्यंतरी केंद्र शासनाकडून तिहेरी तलाकविरूध्द कायदा आणण्याचे संकेत देण्यात आले होते. मुस्लीम सत्यशोधक मंडळासाठी हा महत्वाचा आणि प्राधान्याचा विषय आहे म्हणून मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून निवेदन देण्याचे ठरवले. तशी तयारी केली. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याची बातमी सर्वत्र आली. याकाळात अनेक समाजवाद्यांनी भुवया उंचावल्या. मुस्लीमविरोधी हिंदुत्ववादी पंतप्रधानांना भेटल्याची आमच्यावर टीका होऊ लागली. तलाकची समस्या, मुस्लीम महिला प्रश्न त्यासंदर्भात आमचे उद्दिष्ट, पोटतिडीक आणि भूमिका मांडणारा माझा लेख साप्ताहिक साधनात प्रसिद्ध झाला.
या लेखात समाजवादी मंडळीचे मुस्लीम सत्यशोधक मंडळाबद्दल कसे अपसमज आहेत आणि त्यांची टीका कशी निराधार आहे. याचाही उल्लेख होता. हा लेख मा.पन्नालाल सुराणांच्या वाचण्यात आला. त्यांनी ताबडतोब पोस्टकार्ड पाठवले त्यात त्यांनी लिहले होते,"सर्व समाजवाद्यांना सारखे मानण्याची चूक करू नये.” पंतप्रधानांना भेटून तलाक विधेयकासंदर्भात निवेदन देण्याच्या आमच्या भूमिकेचे भाऊ, भाई [ मा.भाई वैद्य] आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मा.पी.बी. सावंत यांनी समर्थन केले होते.
"शमु, मी पुण्यात आलोय. तुला जमेल तेव्हा भेटायला ये." भाऊंचा असा फोन आता येणार नाही. हा विचार खूप अस्वस्थ करतो.
मरणोत्तर देहदान करून भाऊंनी ऐहिक जीवन अधिक समृद्ध केले.
धन्यवाद भाऊ!
भाऊंना विनम्र अभिवादन!
शमसुद्दिन तांबोळी
मुस्लीम सत्यशोधक मंडळ.