मुंबई : वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण, अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे बसविण्यात आलेल्या सायकल कॅरिअरद्वारे वाहून नेत असल्यास, अशा वाहनांवर यापुढे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे एक साधन त्याचप्रमाणे कोणत्याही भागाच्या शेवटच्या स्थानापर्यंत सहज जाता येते. याकरिता जगातील अनेक देशांमध्ये बरेचजण वाहनाचा वापर न करता सायकलचा वापर करत असतात. बरेचसे वाहनधारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरिअर बसवून त्याचा वापर सायकल वाहून नेण्यासाठी करत असतात.
मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमात वाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरिअर लावण्याबाबत कुठेही प्रतिबंध नाहीत. असे असतानादेखील अशा वाहनांवर परिवहन विभाग तसेच पोलीस विभाग यांच्या अंमलबजावणी पथकांमार्फत कारवाई केली जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यापुढे अशा सायकल कॅरिअरवर कुठलीही कारवाई होणार नाही असे परिपत्रकात नमूद केले आहे.