करोडोच्या जमिनींसाठी दूध संपवलं

Update: 2025-08-03 12:08 GMT

संजीव साबडे

लहानपणची पहिली आठवण. महापालिकेच्या शाळेत असताना शक्यतो दांडी मारत नसे. याचं कारणं शाळेत रोज मधल्या सुटीच्या आधी वा नंतर सर्व विद्यार्थ्यांना मोफत थंड दूध प्यायला दिलं जाई. त्यासाठी सारे विद्यार्थी अजिबात चुळबुळ न करता रांगेत उभे राहत. ‘आरे’ असा उल्लेख त्या 200 मिलिलिटर दूध असलेल्या बाटलीवर दूध असे. ते टोन्ड दूध असल्यानं बाटलीचं बूच लाल रंगाचं. त्या बुचालाही दुधाची मलई वा साय चिकटलेली असे. तीही आम्ही सारी मुलं चाटून खात असू. एखाद दिवशी दूध जास्त आलं वा विद्यार्थी कमी असले की दोन बाटल्या दूध प्यायला मिळत असे. तसं होणं ही चंगळच असायची. कधी कधी दुधाच्या ऐवजी चार बिस्कीटं दिली जात. ती खातानाही आठवण यायची त्या दुधाची.


 



दुसरी आठवण. रोज सकाळी आरेच्या दूध केंद्रावरील रांगेत उभं राहून दूध आणावं लागत असे. घरात पाच जण आणि दूध घेत असू अर्धा लिटर. ते सारं चहात संपून जाई. म्हणजे घरी दूध प्यायला मिळणं अशक्यच. त्यामुळे शाळेत रोज जायचं. कधी सणासुदीला एक लिटर दूध घेत असू. त्यासाठी आदल्या दिवशी दूध केंद्रावर वालावलकर बाईंना सांगावं लागे. त्या तेवढी जास्त ऑर्डर नोंदवत. कधी अचानक अधिक दूध हवं असेल तर थांबायला सांगत. त्या काळात दुधासाठी कार्ड असे. सर्व कार्डधारकांना देऊन दूध शिल्लक राहिलं तर त्या अर्धा वा एक लिटर जादा दूध देत. खासगी डेअरीपेक्षा दूध केंद्रावर मिळणारं सरकारी दूध स्वस्त. त्यामुळे बहुसंख्य लोक तेच घेत. टोण्ड दूध जरा स्वस्त आणि होल दूध घट्ट असल्यानं काहीसं महाग. त्या बाटल्याचं बूच निळं.


 



तिसरी आठवण. उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुट्टीत काही नातेवाईक घरी राहायला येत. त्यांना मुंबई दाखवणं हा दिवसांचा कार्यक्रम असे. जुहू वा गिरगाव चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, राणीची बाग, मत्स्यालय वगैरे. एक दिवस आरे कॉलनी. जवाहरलाल नेहरू यांनी उदघाटन केलं होतं डेअरीचं. पाहुण्यांबरोबर किती वेळा आरे दूध डेअरी व आरे कॉलनी गेला, हेही आठवत नाही. यंत्रातून बाटलीत दूध भरलं जाणं, आपोआप झाकण लागणं याची गंमत वाटे. खरी मजा बाहेर आल्यावर असे. तेव्हा आरेचं गोड दूध मिळे. एनर्जीच्याही खूप आधी. ते सर्वांसाठी विकत घेतलं जाई. ते झालं की छोटा काश्मीर, पिकनिक पॉईंटला जायचं.

चौथी लहानशी आठवण. नोकरी करू लागलो, तेव्हा आरेचं एनर्जी हे वेगवेगळ्या स्वादांचं गोड दूध बाजारात आलं होतं. आम्ही मित्रमंडळी ते बऱ्याचदा पीत असू. एकदा मित्र म्हणाला, एक एनर्जी आणि एक मँगोला घेऊन मिक्स करू आणि पिऊ. तसं केलं आणि तयार झालेला मँगो मिल्क शेक प्यायलो. कधी आरेची लस्सी पिणं सु्रू झालं, घरी कधी आरेचं तूपही आणलं जात असे.


 



शेवटची आठवण लहान असण्याचं कारण तोपर्यंत सरकारी, सहकारी वं खासगी दूध योजनांचं बक्कळ दूध बाजारात येऊ लागलं होतं. दुधासाठी रेशनसारखं कार्ड आणि रांग हा प्रकार बंद झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली दूध टंचाई आरे, वरळी आणि कुर्ला डेअरीमुळे पूर्णपणे थांबली होती. मागणीपेक्षा अधिक दूध मुंबईत येत होतं. वारणा, अमूल, महानंद, गोकुळ यांच्या दूध आणि दुधाच्या पदार्थांद्वारे पांढरी दुग्धक्रांती झाली होती. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना गायी-म्हशीमुळे अतिरिक्त उत्पन्न मिळू लागलं होतं. मुंबईच्या उपनगरांत सांताक्रूझ ते दहिसरपर्यंत म्हशीचे असंख्य गोठे होते. आरे कॉलनीत असलेले वेगळेच. त्यामुळे गोरेगावला वॅगनमधून म्हशी आणल्या वा नेल्या जात. मालगाड्या भरून गवत येत असे. गोरेगावच्या पूर्वेला त्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्मच होता. तिथं जणू जनावरांचा बाजारच भरलेला दिसे. बैल बाजार मात्र कुर्ल्यात. गोठ्यामुळे उपनगरांच्या रस्त्यांवरून गायी-म्हशीचा वावर असे. ठिकठिकाणी शेण पडलेलं असे. अंगण सारवायला ते आणत असू. दिवाळीच्या आधी गोठ्यात जाऊन दोन दोन बादल्या शेण आणावं लागे.

मग उपनगरांतील गोठे मुंबईबाहेर हलवण्याचा निर्णय झाला. डहाणू तालुक्यातील दापचारी या ठिकाणी बरेचसे तबेले व गोठे हलवण्यात आले. जवळपास सर्व गोठे-तबेले स्टेशनच्या जवळ वा एस. व्ही. रोडला लागून होते. आता एखाद-दुसरा गोठा दिसतो. जिथं ते होते, तिथं अनेक इमारती व टॉवर्स दिसू लागले आहेत. म्हणजे लोकांना राहण्यासाठी घर मिळालं. पण या जमिनींनाही करोडो रुपये मिळाले. कापड गिरण्या बंद झाल्यावर जे झालं तेच इथं झालं. तिथल्या जमिनीचेही करोडो रुपये मालकांना मिळाले होते आणि त्या जागीही फक्त धनिकांसाठी महागडी घरं बांधली गेली. कामगार बेकार झाले आणि यंत्रसामग्री भंगारात गेली. त्या काळात मुंबईत गँग वॉर झाल्याचंही पाहायला मिळालं.


 



बैलाचे गोठे, तबेले मुंबईबाहेर गेले. त्याचं काळात अमूल, महानंद, वारणा, गोकुळ यांनी दूध वं दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेवर कब्जा केला. त्यावेळी आरे, कुर्ला, वरळी दूध योजनांत सरकारने गुंतवणूक केली नाही. त्यांच्या पदार्थांचं हवं तसं मार्केटिंग केलं नाही. त्यामुळे सरकारी दूध व उत्पादनं बाजारातून हळूहळू दिसेनाशी झाली. मग मदर डेअरीही मुंबईच्या बाजारात घुसली. राज्य सरकारची कुर्ला डेअरी बंद करण्यात आली. तिथली यंत्रसामग्री गंजली होती. त्यामुळे तीही बाहेर काढण्यात आली. नोकरभरती बंदच होती. होते ते कर्मचारीही निवृत्त होत गेले. काहींना अन्य खात्यात पाठवण्यात आलं. आता धारावी झोपडपट्टीतील लोकांना पक्की घरं देण्यासाठी राज्य सरकारने 1300 कोटी रुपये किमतीची जमीन म्हणे फक्त 58 कोटी रुपयांत अदानीच्या कंपनीला दिली.


 



कुर्ला डेअरी बंद झाली. मग वरळी डेअरी बंद केली. तेथील 15 एकर जागा रिकामी झाली. थोडे कामगार होते, त्यांना आरे डेअरीत पाठवलं. घरंही रिकामी करून घेतली. मग वरळीत समुद्रासमोर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार, असं सांगितलं. नंतर जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र होईल, असं सांगितलं गेलं. प्रत्यक्षात ती जमीन गेली नगरविकास खात्याकडे आणि तिथून महसूल खात्याकडे. म्हणजे तिथं सरकारी इमारती वा कार्यालयं होऊ शकतील वा कदाचित ती जागाही अदानी वा तत्सम कोणाकडे जाऊ शकेल.


 



आरे डेअरी हा आरे कॉलनीत म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. तो संपूर्ण हिरवागार वनराईचा भाग आहे. त्यामुळे या परिसराला मुंबईचं हृदय म्हटलं जातं. बऱ्याच वर्षांपूर्वी त्याचा एक तुकडा फिल्मसिटीला दिला. पुढे मोठं तारांकित हॉटेल आलं, घरं आली, वस्ती आली. ती कमी म्हणून की काय आरे कॉलनीत मेट्रोची कार्ड शेड आणून टाकली. त्यासाठी शेकडो वा हजारो झाडांची कत्तल झाली. आरे डेअरीही केव्हाचीच बंद झाली. मग आरेच्या नावानं दूध उत्पादनाची परवानगी खासगी कंपनीला आणि नंतर महानंदला दिली. पण महानंदच चालली आहे मदर डेअरीमार्फत गुजरातकडे.

आरेचं एकही उत्पादन आता मुंबईत दिसत नाही. फक्त अमूल, वारणा, गोकुळ, गोविंद, गोवर्धन, मदर यांचीच उत्पादनं बाजारात आहेत. या तीन दूध योजना बंद होणं हा मराठी माणसालाच धक्का आहे. महाराष्ट्राच्या मराठी सरकारनेच तो दिला आहे. भविष्यात तिथंही गगनचुंबी इमारती दिसतील कदाचित.

Tags:    

Similar News