आज ३० ऑगस्ट ! डॉ. कलबुर्गींचा दहावा स्मृतिदिन ! दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना राहत्या घरी गोळ्या घालून मारण्यात आले. डॉ. कलबुर्गींना विनम्र अभिवादन !
ग्रंथ, ग्रंथकार नेहमीच तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या रडारवर असतात. कन्नड भाषेत विविध विषयांवर प्रचंड ग्रंथसंपदा निर्मिणारा हा विद्वान, जेव्हा स्वतःच्या द्रविड असण्यावर ठाम भूमिका घेतो, स्वतःची संस्कृति जपताना हिंदू असणं नाकारतो, बसव अण्णांच्या भाषेत लिंगायत धर्म सांगू पाहतो तेव्हा आपोआपच रडारवर येतो. स्वतःचं लिंगायत असणं हे जेव्हा डॉ. कलबुर्गी द्रविड संस्कृतीशी जोडतात तेव्हा त्यांचा खून होतो. तथाकथीत हिंदू संस्कृती रक्षकांनी द्रविड संस्कृती जपणाऱ्या विचारवंताचा केलेला हा खून हिंदू धर्मातल्या वाढत्या असहिष्णुतेचं एक ठळक उदाहरण आहे.
३० ऑगस्ट २०१५ नेहमी सारखाच उजाडला असणार धारवाडमधे. एक शांत निसर्गरम्य शहर नेहमीप्रमाणे जगत असणार आणि अचानक कोण माथेफिरु येतो आणि एका संशोधकाला, विद्वानाला गोळी मारुन निघुन जातो. अभ्यास चालू आहे, पुस्तकं, संदर्भग्रंथ टेबलावर आहेत आणि लिहितावाचता संशोधक रक्ताच्या थारोळ्यात ? कोण कसली शिक्षा देतय? कोणाच्या आदेशाने ? तेही धारवाडसारख्या सुसंस्कृत शहरात ? काय वाटलं असेल धारवाडवासियांना ? एका अभ्यासकाची अखेर इतकी क्रुर ? डॉ. कलबुर्गींच्या अंत्ययात्रेला धारवाडला अवघा कानडी माणूस लोटला होता आणि एका निर्भिड विचारवंताला, खरा बसव अण्णा सांगणाऱ्या एका संस्कृतीरक्षकाला वंदन करत होता.
वर्षभराने धारवाडला दक्षिणायनच्या माध्यमातून डॉ. कलबुर्गी स्मृतीदिनानिमित्त शांती मार्च आयोजित केला होता. त्यावेळी एका धारवाडकर विद्वानाप्रती धारवाडकरांत दिसलेला आदर मी विसरु शकत नाही. शांती मार्च निघाला होता डॉ. कलबुर्गींच्या निवासस्थानापासून आणि आजूबाजूच्या घरातली माणसं आपोआप सामिल होत होती. चौकाचौकातून गावातील शाळा कॉलेजातली मुलं सामिल होत होती आणि त्याचबरोबर कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार सामिल होत होते. एक निर्धार होता त्या सर्वांच्या मनात आणि शांतपणे काळ्या फिती लावून शांतीमार्च पुढे सरकत होता. आणि मी परत एकदा मनाने पोहोचले कलबुर्गी निवासात.
डॉक्टर कलबुर्गी यांचे राहतं घर वर्षभरानंतरही त्यांच्या साहित्याच्या आणि अभ्यासाच्या खुणा दाखवत होतं. त्यांच अर्धवट राहिलेलं अप्रकाशित साहित्य प्रकाशनाच्या मार्गावर होतं. कन्नडमध्ये लिहिलेलं त्यांचं संशोधनात्मक साहित्य हे द्रविडी संस्कृतीचा धांडोळा घेणारं आणि स्वाभिमानाने संस्कृतीरक्षण करणारं आहे. मुंबई विद्यापिठातील कन्नड भाषा विभागाच्या मदतीने कलबुर्गींच्या साहित्यावर एक प्रदर्शन बनवण्याच्या निमित्ताने डॉ. कलबुर्गी यांची विविध विषयांवरची पुस्तक हाताळायला मिळाली होती, ती सर्व त्यांच्याच घरात त्यांच्या पश्चात बघताना हुंदकाच दाटून आला आणि कुठेतरी ही व्यक्ती, हा अभ्यास आपल्या जवळचा का वाटतो याचं उत्तर मिळालं असं वाटायला लागलं.
डॉ. कलबुर्गींच्या खुनामुळे डॉक्टर कलबुर्गी यांचे कुटुंबिय, त्यांचे विद्यापीठातील सहकारी आणि विद्यार्थी यांच्याबरोबरच आपलं सर्वांचं अपरमित नुकसान झालं आहे. करोनाआधीच्या ऑक्टोबर महिन्यात धारवाडला गेले असताना आवर्जुन कलबुर्गींच्या घरी गेले होते. अजूनही बंदोबस्ताला असणारा पोलिस बाहेर होताच. पण बंद दाराआडही या ज्ञानयोग्याच्या ग्रंथसंपदेत भरच पडली होती. कलबुर्गीसरांच्या अप्रकाशीत लेखनावर आवश्यक ते काम करुन त्यांची काही पुस्तकं प्रकाशीत करण्याचं काम त्यांच्या सुविद्य पत्नीनं चालूच ठेवलय. आम्ही त्यांना भेटायला महाराष्ट्रातून आलोय कळल्यावर त्यांनी अगत्याने नवीन प्रकाशित साहित्य आम्हाला दाखवलं. आयुष्यभर संशोधनात, लेखनात मग्न असलेले डॉ. कलबुर्गी आणि त्यांच्या सोबत त्यांच्या कामात त्यांना कृतीशिल साथ देणारी त्यांची सहचारिणी यांच्या सहजीवनाचाही खून या खूनाने केला आहे.
हा खून करुन एका असहिष्णु विचारानं एक सुसंकृत विचार संपवण्याचा प्रयत्न केला आहे आणि माणूस मारुन विचार संपत नसला तरी व्यक्तीबरोबर तिची क्रियाशील बुध्दी नष्ट होते या न्यायाने एका लिहित्यावाचत्या विचारवंताचा हा खून आपलं खूप मोठं नुकसान करुन गेला आहे. विचारवंतांच्या हत्येतून एका संस्कृतीरक्षक विचाराचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न कलबुर्गींचा विचार जास्तीत जास्त पसरवून हाणून पाडला पाहिजे. ज्या द्रविड संस्कृतीबाबत कलबुर्गी बोलत होते, ज्या बसवण्णाचे विचार कलबुर्गी मांडत होते त्या प्रागतिक संस्कृतिचा, त्या पुरेगामी विचारांचा आपण एक भाग आहोत हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
आज आपल्या देशात धार्मिक असहिष्णुता वाढतच चाललीय, देशातील विविधता, बहुसंस्कृतितता नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. धर्म, संस्कृती यांच्यातल्या विविधतेने समृध्द असलेला देश ही आपली ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणूनच कोणी काय खावं, काय बोलावं याचबरोबर काय लिहावं, काय वाचावं यावरही बंधनं येताना दिसायला लागलीत. डॉ. कलबुर्गींच्या स्मृतीदिनानिमित्त आपल्या सहिष्णु संस्कृतिला टिकवण्याचा, त्यातील मानवी घटकाला महत्व देण्याचा प्रयत्न करुया. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सध्या संस्कृतीविलिनीकरणाचे वारे वाहतेय, ते समजून घेऊन विविध संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणे ही डॉ. कलबुर्गींसारख्या निर्भिड विद्वानाला आदरांजली ठरेल.
सिरत सातपुते