Ajit Pawar Passed Away : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

Update: 2026-01-28 04:46 GMT

Ajit Pawar Passed Away महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रमुख नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात विमानातील सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती DGCA (Directorate General of Civil Aviation) ने अधिकृतपणे दिली आहे.

अपघात कसा घडला?

अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी चार्टर्ड विमानाने (Learjet 45) निघाले होते. आज सकाळी सुमारे ८.४५ वाजता बारामती विमानतळावर लँडिंग करताना विमान रनवेवरून बाजूला गेले आणि शेतात कोसळले.  विमान कोसळल्यानंतर लगेच आग लागली. धुराचे लोट आणि विमानाचे जळलेले अवशेष यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमानात अजित पवार यांच्यासह दोन सुरक्षा कर्मचारी, दोन क्रू मेंबर्स (पायलट आणि सहाय्यक) असे एकूण ६ जण सवार होते. सर्वांचा अपघातातच मृत्यू झाला.

DGCA ने सांगितले की, अपघातात कोणताही प्रवासी जिवंत राहिला नाही. अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड, हवामान किंवा लँडिंगच्या वेळी चूक असू शकते. पूर्ण तपास सुरू झाला आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, पोलिस, वैद्यकीय पथके आणि प्रशासन यांच्या टीम्स दाखल झाल्या. जळालेल्या अवशेषांमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

दरम्यान,  सुप्रिया सुळे, पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार हे दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाले आहेत.

अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण महाराष्टात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया माध्यमं, सोशल मीडियावर येत असून ही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामतीत रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी असून कार्यकर्त्यांचा टाहो पाहायला मिळत आहे.


Full View

Similar News