राज्यातील पुरस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावू नये असं आवाहन केलं आहे. मात्र बीडमध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
बीड, परळी, माजलगाव गेवराई यासह जिल्ह्यातील चौका - चौकात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसैनिकांना राज्यातील परिस्थितीचा विसर पडला की काय? असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
परळी शहरातील टॉवर चौकात मुख्यमंत्री ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे 45 फुटी बॅनर्स लावण्यात आले आहेत, तर बीड शहरातील मुख्य चौकात , छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर - नाका परिसरात जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर बॅनर्सने झळकवण्यात आलेत. त्यामुळे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारे शिवसैनिक आता पक्षात राहिले नाहीत का? असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.