अजित पवार आणि भाजपा मध्ये नक्की डील काय झालंय...

Update: 2019-11-24 09:38 GMT

अजित पवार (Ajit pawar) यांनी रातोरात भाजपाला (BJP) समर्थन का दिलं, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली, भाजपा आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकं डील काय झालं असे प्रश्न आता आमदारांना पडले आहेत. अजित पवार यांनी शपथ घेण्याआधी ते रात्रभर मुंबईच्या ट्रायडंट हॉटेल मध्ये सहा आमदारांसोबत बसून होते.

या वेळेस त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis)यांचे जवळचे मित्र धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे ही होते. सकाळी अजित पवारांनी बाकी आमदारांची ही जुळवाजुळव केली मात्र यातील बहुतेकांना नक्की डील काय झालंय हेच माहित नाहीय.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याआधी नेमका किमान कार्यक्रम काही ठरवला गेला आहे का, सत्तेत समसमान वाटा मिळणार आहे का की केवळ अजित पवारांनाच मंत्रीपद मिळणार आहे या बाबींवर अस्पष्टता आहे. अजित पवार हे स्वभावाने फटकळ आणि निर्णय घेण्यात धडाडी दाखवत असल्याने त्यांनी भाजापा सोबत बसून वाटाघाटी केल्या नसतील यावर राष्ट्रवादीच्या आमदारांचा विश्वास आहे.

अजित पवार यांनी जर बसून सत्तेतील पदांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपाबाबत चर्चा केली नसेल तर मग दादांसोबत जाऊन काय उपयोग असा प्रश्न ही राष्ट्रवादीच्या आमदारांना पडला आहे. अजित पवार यांच्या भाजपाला मदत करण्याच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे, मात्र आता आमदारांना जास्त काळजी अजित पवार यांनी नक्की डील काय झालं आहे हे न सांगितल्यामुळे वाटू लागलीय.

Similar News