वरवरा रावांना जामीन मिळाला तर काय होईल? उच्च न्यायालयाची 'एनआयए'ला विचारणा

अंथरुणाला खिळलेल्या 82 वर्षाच्या आरोपीला चष्म्याशिवाय दिसत नाही, मग काही अटी शर्ती टाकून जामीन दिला तर काय हरकत आहे? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने एनआयएला उपस्थित केला आहे.

Update: 2021-01-29 11:35 GMT

अटकेत असलेल्या ८२ वर्षांच्या व्यक्तीच्या जगण्याचा दर्जा काय असू शकतो? तुमच्या भीतीमुळे जामीन नाकारल्याने राव यांनी पुन्हा नानावटी रुग्णालयात नेण्याची वाट पाहायची का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) केली आहे.

शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वरावर राव यांच्या कुटुंबियांच्या वतीने उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीनाची मागणी करण्यात आली आहे.

राव हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रकरणातील आरोपी आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याच्या मागणीसाठी राव यांनी केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने त्यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घ्यावे, अशी भूमिका NIA नं कोर्टात मांडली आहे. वरवरा राव हे काही एकटेच वृद्ध आरोपी नाहीत. विविध आजारांनी ग्रस्त अनेक कच्चे कैदी आणि आरोपी कारागृहात आहेत. त्यांची कारागृह प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाते. शिवाय राव यांना कठोर अटींवर अंतरिम जामीन मंजूर करण्याऐवजी न्यायालयाने राज्य सरकारवर त्यांची योग्य ती काळजी घेण्याची अट घालण्याचे एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सूचित केले.

सर्वोच्च न्यायालयाने ८५ वर्षांच्या आसाराम बापूंनाही गंभीर आरोपांमुळे जामीन देण्यास नकार दिल्याचे सिंह यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

राव यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना कारागृहात पाठवण्याऐवजी तीन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणी राव आणि त्यांच्या कुटुंबियांनी स्वतंत्र याचिकेद्वारे केली आहे. त्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमुर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

Tags:    

Similar News