...भरलेल्या विहिरी आत्महत्या करण्यासाठी ! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर महिला शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Update: 2019-11-06 07:38 GMT

आमचा सातबारा कोरा झाला पाहिजे, आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे, आज आमच्या शेतातील पूर्ण नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, बाजरी पूर्ण वाया गेली आहे. आमच्यासमोर अनेक संकट उभं राहिली आहेत. मुलीचं लग्न करायचं आहे. कर्जमाफी झाली नाही.

पाऊस नव्हता तेव्हा पण आम्ही अडचणीत होतो. आजही अडचणीत आलो आहोत. या ओल्या दुष्काळाने सर्व विहिरी भरल्या आहेत. त्यामुळे आज आम्हाला असं वाटतंय की, या भरलेल्या विहिरी आम्हाला आत्महत्या करण्यासाठी भरल्यात !

अशी संतप्त भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धावत्या दौऱ्यानंतर महिला शेतकऱ्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली.

बीड जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि गेवराई येथील पिकांची पाहणी ते करणार होते. या दरम्यान माजलगाव येथे उद्धव ठाकरे आले असताना, त्यांनी पिकाची पाहणी न करताच, शेतकऱ्यांशी संवाद न साधता, चार पाच मिनिटाचे भाषण करून, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून न घेण्याचा प्रयत्न करत आपला धावता दौरा पूर्ण केला.. याचे सर्व दृश्य मॅक्स महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत...

दरम्यान उद्धव ठाकरे यांची हे शेतकरी अडीच ते तीन तास वाट पाहत होते. सायंकाळी 6 वाजताचा नियोजित दौरा 8 : 15 च्या दरम्यान सुरू झाला. यासाठी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना पिकांची पहाणी करण्यासाठी चिखलमय शेतात अडचण येईल, यासाठी नियोजित कार्यक्रम स्थळालगत, सोयाबीन कापूस, बाजरी हे पीकं जमा करून ठेवले होते. तर याच पिकांभोवती शेतकरी हे सर्कल करून उभा होते, ज्याने करून त्यांना त्यांच्या समस्या व्यक्त करता येतील. परंतु या वाट पहात बसणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधत, पीक पाहण्याची तसदी देखील ठाकरे यांनी घेतली नाही...

यामुळे जवळपास अडीच तास, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी, निराशाच पडली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Full View

Similar News