निवडणूकीच्या तोंडावर सुधागडमध्ये भाजपला मोठा दणका

Update: 2019-10-08 10:52 GMT

आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार व प्रसारकामी रान उठविले आहे. अशातच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुधागडमध्ये भाजपाला मोठा हादरा बसला आहे.

भाजप सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी नुकतेच तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस राजेश मपारा यांच्या अरेरावी आणि दंडेलशाहीला कंटाळून हे राजीनामे दिले असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

वैंकुठ निवास पेण येथे विधानसभा उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारासंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत प्रचार नियोजनाची चर्चा करताना राजेश मपारा आणि राजेंद्र राऊत यांच्यात खटका उडाला होता. दोघांच्यातील हा वाद हाणामारी पर्यंत गेला. वरिष्ठांनी मध्यस्थी करून त्यावेळी हा वाद मिटवला होता.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी सांगीतले की, “कधी नव्हे ते भारतीय जनता पार्टीला सुगिचे दिवस आले आहेत. रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातुन पक्षाला आमदार मिळू शकतो. आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मात्र, जिल्हा चिटणीस राजेश मपारा हे आम्हाला काम करु देत नाहीत. नुकतीच शिवसेने सोबत झालेली बैठक असेल किंवा आरपीआय सोबत झालेली बैठक असेल, गाव बैठका या सर्वांपासुन आम्हाला राजेश मपारा हे जाणीपुर्वक दुर ठेवत आहेत. तालुका अध्यक्ष असुनही मला आणि इतर पदाधीकाऱ्यांना अपमानास्पद वागणुक मिळत आहे. आम्ही अनेक ठिकाणी पक्ष वाढवला आहे. मात्र राजेश मपारा यांच्या मनमानी कारभारामुळे व्यथीत होऊन आम्ही राजीनामे देत आहोत.”

पेण सुधागड रोहा मतदारसंघात माजी मंत्री रविशेठ पाटील आणि आमदार धैर्यशील पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. एक एक मत विजयश्री खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र काही दिवसांवर मतदान कार्यक्रम असताना आणि ज्यावेळी घराघरात मतदारांपर्यंत पोहचण्याची वेळ आहे. यावेळेसचं भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या सुधागडातील प्रचाराला हो नाही म्हणता म्हणता मोठी खीळ बसणार असुन धैर्यशील पाटील यांना आपसूकच उभारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

https://youtu.be/W23ARKQCgR0

Similar News