रोहिणी खडसेंना हरवण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची खेळी?

Update: 2019-10-07 13:29 GMT

एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर मतदार संघाची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार अशी चिन्हं आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अडून बसल्यानंतर कन्या रोहिणी खडसेंना अखेरच्या दिवशी तिकीट मिळालं. राष्ट्रवादीनंही खडसेंसाठी तिकीट होल्डवर ठेवलं होतं.

मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादीच्या तिकिटांसाठी शेवटच्या तासात नाट्यमय घडामोडी रंगल्या, खडसेंचे कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीशी बंडखोरी केली. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचा AB फॉर्म मिळणार होता. मात्र, स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध करत जिल्हाध्यक्ष रवींद्रभय्या पाटील यांच्यासाठी शेवटच्या 30 मिनिटात राष्ट्रवादीचा AB फॉर्म मिळवला.

आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगून शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांना महाआघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने पाठिंबा दिलाय.

विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध शिवसेनेचे चंद्रकांत पाटील या अटीतटीच्या सामन्यात खडसे फक्त नऊ हजार मतांनी निवडून आले. खंडसेना हरवण्यासाठी राष्ट्रवादीनं छुपा पाठींबा पाटील यांना दिला होता.

चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेची उघड मदत मिळणार आहे. तसेच पाटील यांचे गिरीश महाजन यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, मात्र चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. याचा फायदा खडसे कसे उचलतात यावर सर्व काही अवलंबून आहे.

स्वतः एकनाथ खडसे निवडणूक रिंगणात नसल्याने या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. रोहिणी खडसेंविरोधात चंद्रकांत पाटील यांचा सरळ सामना रंगणार आहे खडसेंना आता ही निवडणूक आता सोपी नाही. आता ही लढत सरळ सरळ खडसे परिवार विरुद्ध भाजपसह सर्वपक्षीय अशीच म्हणावी लागेल.

Similar News