थरार : चेसीस तुटलेली भरधाव बस, बाईकस्वाराला धडक

Update: 2021-08-05 12:39 GMT

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या एका बसची चेसीस तुटली असतानाही बसचालकाला ती बस भरधाव नेल्याचा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बसमध्ये प्रवासीसुद्धा होते. रस्त्यावरुन जाणारी ही बस एका बाजूला झुकत असल्याचे एका व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने याचा व्हिडिओ शूट केला, हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

औरंगाबाद बस स्थानकातून धुळ्याला जाणारी ही बस होती. काही अंतर गेल्यानंतर या बसची चेसीस तुटली आणि बस वेडीवाकडी धावू लागली. या बसच्या धक्क्याने एक बाईक चालक जखमी झाला आहे. बसमधील २९ प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बसचालकाविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार घडल्यानंतर बुधवारी या चालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला.

एसटी बसचालक दीपक रमेश पाटील (३८, रा. फागणे, ता. जि. धुळे) हे बस (एमएच न १४ डीटी २११९) घेऊन दुपारी तीन वाजता औरंगाबाद बसस्थानकावरून धुळ्याकडे निघाले होते. रस्त्यातच बसच्या चेसिसचा बोल्ट निखळला आणि चाक एका बाजूला आणि बसचा वरचा भाग दुसऱ्या बाजूला झुकला. त्यामुळे बसचा तोल जाऊन बस वेडीवाकडी चालायला लागली. रस्त्यावरील अनेकांच्या हा प्रकार लक्षात आला, मात्र चालकाल त्याचे गांभीर्य कळले नाही. एका दुचाकीस्वाराला धक्का लागला असता पण तो थोडक्यात वाचला. यानंतर बसचालकाला हा प्रकार लक्षात आला. तरीही त्याने बस सुसाट नेली. इतर वाहनचालक त्याला थांबवण्याच्या प्रयत्नात असतानाच बसची धडक एका बाईकला बसली आणि त्यानंतर चालकाने बस थांबवली. हेल्मेट परिधान केलेले असल्याने बाईक चालक सुरक्षित होते. या प्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News