Gold vs Equity रिटर्न्स : गुंतवणुकीत सोनंच 'किंग'! २० वर्षांत शेअर बाजारालाही टाकले मागे

Gold vs. Equity Returns: Gold is the 'king' in investments! It has surpassed the stock market over 20 years.

Update: 2025-12-11 11:34 GMT

पारंपारिक भारतीय मानसिकतेमध्ये सोन्यातील गुंतवणुकीला नेहमीच सुरक्षित मानले जाते. आता आकडेवारीनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. 'फंड्स इंडिया'ने (FundsIndia) प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यास अहवालानुसार, दीर्घकालीन गुंतवणुकीत सोन्याने (Gold) शेअर बाजार (Equity) आणि रिअल इस्टेटसारख्या (Real Estate) प्रमुख क्षेत्रांना धोबीपछाड दिली आहे.गेल्या २० वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, सोन्याने गुंतवणुकदारांना मालामाल केले असून, परताव्याच्या बाबतीत इतर सर्व एसेट क्लासला (Asset Class) मागे टाकले आहे.

रिअल इस्टेटची सुमार कामगिरी

गेल्या दोन दशकांत भारतीय शेअर बाजाराने (निफ्टी ५० टीआरआय नुसार) १३.५ टक्के वार्षिक चक्रवाढ परतावा (CAGR) दिला आहे. त्या तुलनेत सोन्याने (रुपयांच्या टर्ममध्ये) तब्बल १५ टक्के परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, ज्या रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी गुंतवणूक मानले जाते, त्याची कामगिरी अतिशय सुमार राहिली आहे. रिअल इस्टेटने केवळ ७.८ टक्के तर डेट (Debt) फड्सने ७.६ टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच महागाईचा विचार करता रिअल इस्टेट आणि डेटमधील गुंतवणूक तळाशी राहिली आहे. या अहवालात एक रंजक बाब समोर आली आहे. भारतीय शेअर बाजाराने १३.५ टक्के परतावा दिला असताना, अमेरिकन शेअर बाजाराने (S&P 500 रुपयांच्या टर्ममध्ये) १४.८ टक्के परतावा दिला आहे.

५ वर्षांतही सोन्याचीच चमक !

केवळ दीर्घकाळासाठीच नाही, तर मध्यम कालावधीतही सोनेच भारी ठरले आहे. गेल्या ५ वर्षांच्या आकडेवारीनुसार:

सोन्याने २३.२% परतावा दिला आहे. अमेरिकन इक्विटीने १९.६%, तर भारतीय इक्विटी: १६.५% परतावा दिला आहे.

सोने का वधारले ?

जगभरातील मध्यवर्ती बँकांनी (Central Banks) सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच, भू-राजकीय तणाव (Geopolitical tension), रुपयाची घसरण आणि शेअर बाजारातील महागडे व्हॅल्युएशन यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सोने हेच 'सुरक्षित आश्रयस्थान' (Safe Haven) ठरले आहे.

सोन्यात आता गुंतवणूक करावी का ?

सोन्याचे उत्पादन मर्यादित होत आहे, तर मागणी मात्र कायम आहे. २०२६ च्या अखेरीस सोने ५,००० डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि जागतिक अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ अपेक्षित आहे,असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News