Gold Demand 2025: सोन्याच्या जागतिक मागणीचा ऐतिहासिक उच्चांक ! २०२५ मध्ये ५,००० टनांचा टप्पा पार; गुंतवणुकीत मोठी वाढ

Gold Demand 2025: Global gold demand hits historic high! Crosses 5,000 tonnes mark in 2025; Huge increase in investment

Update: 2026-01-29 09:40 GMT

जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीने २०२५ मध्ये एक नवीन इतिहास रचला आहे. 'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'ने (WGC) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२५ मध्ये सोन्याच्या एकूण जागतिक मागणीने ५,००० टनांचा टप्पा ओलांडून ५,००२ टनांचा नवीन उच्चांक गाठला आहे. प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी वाढलेली सोन्याची मागणी हे या विक्रमी वाढीचे मुख्य कारण ठरले आहे.

WGC च्या 'फुल ईयर २०२५ गोल्ड डिमांड ट्रेंड्स' (Gold Demand Trends 2025) अहवालातील ठळक मुद्दे:

एकूण मागणीत वाढ: २०२४ मध्ये सोन्याची एकूण मागणी ४,९६१.९ टन होती, जी २०२५ मध्ये वाढून ५,००२ टनांवर पोहोचली आहे.

गुंतवणुकीचा ओघ: गुंतवणुकीसाठी (Investment Demand) सोन्याची मागणी २०२४ मधील १,१८५.४ टनांच्या तुलनेत २०२५ मध्ये तब्बल २,१७५.३ टनांपर्यंत वाढली आहे. सुरक्षित गुंतवणूक (Safe-haven) आणि पोर्टफोलिओ वैविध्यीकरणासाठी (Diversification) गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती दिली.

गुंतवणुकीत ८४ टक्क्यांची प्रचंड वाढ

गुंतवणूक मागणी, ज्यामध्ये ईटीएफ (ETFs) आणि बार्स व कॉईन्सचा समावेश होतो, त्यामध्ये २०२५ साली ८४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

प्रमुख कारणे: वाढलेला भू-राजकीय (Geopolitical) आणि भू-आर्थिक (Geoeconomic) तणाव, अमेरिकन डॉलरची कमजोरी, शेअर बाजारातील वाढलेले मूल्यांकन आणि व्याजदरात कपातीची अपेक्षा (विशेषतः ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत) यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे धाव घेतली.

भाव गगनाला, तरीही मागणी जोरात

जानेवारी २०२५ मध्ये 'लंडन बुलियन मार्केट असोसिएशन'वर (LBMA) सोन्याचा सरासरी जागतिक भाव २,७०९.७ अमेरिकन डॉलर प्रति औंस इतका होता, जो जानेवारी २०२४ मध्ये २,०३४ डॉलर होता. भाव वाढूनही मागणी कायम राहिल्याचे दिसून आले.

मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी कायम

२०२५ मध्ये जगभरातील मध्यवर्ती बँकांनी (Central Banks) सोन्याची खरेदी सुरूच ठेवली असून, अधिकृत क्षेत्राने (Official Sector) ८६३ टन सोने साठ्यात जोडले आहे. ऑक्टोबर-डिसेंबर या चौथ्या तिमाहीत खरेदीने जोर धरला आणि या काळात २३० टन सोन्याची खरेदी झाली.

सर्वाधिक खरेदी करणाऱ्या बँका: १. नॅशनल बँक ऑफ पोलंड: १०२ टन (सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक खरेदीदार) २. नॅशनल बँक ऑफ कझाकस्तान: ५७ टन ३. सेंट्रल बँक ऑफ ब्राझील: ४३ टन ४. स्टेट ऑईल फंड ऑफ अझरबैजान: ३८ टन ५. सेंट्रल बँक ऑफ तुर्की: २७ टन ६. पीपल्स बँक ऑफ चायना (चीन): २७ टन ७. झेक नॅशनल बँक: २० टन

दागिन्यांच्या मागणीत घट, पण मूल्य वाढले

एकीकडे सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर असल्याने, जागतिक स्तरावर दागिन्यांच्या मागणीत (Jewellery Demand) अपेक्षेप्रमाणे १८ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, सोन्याचे भाव वाढल्यामुळे दागिन्यांच्या मागणीचे एकूण मूल्य १८ टक्क्यांनी वाढून १७२ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचले आहे. यावरून दीर्घकाळासाठी ग्राहकांचा सोन्यावरील विश्वास अधोरेखित होतो.

पुरवठ्याच्या बाजूने विचार करता, खाण उत्पादनात वाढ होऊन ते ३,६७२ टनांवर पोहोचले आहे, तर रिसायकलिंगमध्ये (Recycling) ३ टक्क्यांची माफक वाढ झाली आहे.

२०२५ मध्ये सोन्याची मागणी आणि किंमती गगनाला भिडल्याचे पाहायला मिळाले. आर्थिक आणि भू-राजकीय जोखीम आता 'न्यू नॉर्मल' बनल्यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांनीही सोन्याची खरेदी केली. गुंतवणुकीच्या मागणीने या वर्षात बाजी मारली आहे,असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

२०२६ मध्येही आर्थिक आणि भू-राजकीय अस्थिरता कमी होण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे गेल्या वर्षीची सोन्याच्या मागणीतील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सोन्याने ५,००० डॉलर्स प्रति औंसचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याचे दर

अनिश्चित काळात सोन्याचे महत्त्व सिद्ध करतो.

Tags:    

Similar News