यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची घरात घुसून हत्या, संतप्त शिवसैनिकांचा रास्ता रोको

Update: 2022-02-04 11:34 GMT

शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील भांबराजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य सुनील डिवरे यांची हत्या करण्यात आली आहे. सुनील डिवरे हे माजी सरपंच देखील होचे. त्यांची राहत्या घरात घुसून काही जणांनी हत्या केल्याचे सांगितले जात आहे. मारेकऱ्यांनी आधी डिवरे यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर कुऱ्हाडीने देखील त्यांच्यावर वार करण्यात आले. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली.

दरम्यान या घटनेतील सातपैकी चार आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणात सात जणांविरुद्घ गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत गुरूवारी रात्रीच वैभव प्रभाकर सोननकर (वय 23), पवन प्रभाकर सोननकर (वय 25), रोहीत भोपडे (वय 21), सुरेश पात्रीकर (वय 54 सर्व रा. भांबराजा), यांना अटक केली. फरार असलेल्या आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

यवतमाळ बाजार समिती संचालक शिवसेनेचे सुनील डिवरे यांच्या हत्येनंतर भांबराजा आणि परिसरातील लोक संतप्त झाले आहेत. नागपूर-तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. फरार आरोपींना लवकर अटक करावी अशी मागणी आमदार संजय राठोड यांनी पोलिसांकडे केली. सुनील डिवरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही काम करत होते. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केले. डिवरे याच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Similar News