Eknath shinde | नगरपरिषद निवडणुकीत भाजपनंतर शिंदेंची शिवसेना अव्वल

एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, खरी शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिलं

Update: 2025-12-21 10:10 GMT

मुंबई: कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळे निकाल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले असले, तरी एकूण चित्र पाहता या निवडणुकीतही महायुतीनेच बाजी मारल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यातील २८८ जागांपैकी भाजपने १२० जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली असून, त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५४ जागांवर यश मिळवलं आहे. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या नगरपरिषद निवडणुकीतही महायुतीला लँडस्लाईड यश मिळालं आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्येही महायुतीला मोठं यश मिळेल, असे संकेत या निकालांनी दिले आहेत,” असं शिंदे म्हणाले.

भाजपने शतक पार केल्याचं सांगत शिंदे म्हणाले, “शिवसेनेने हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. कमी जागा लढवूनही जास्तीत जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत. शिवसेनेचा स्ट्राईक रेट उत्तम आहे.”

महाविकास आघाडीच्या एकूण जागांपेक्षा शिवसेनेच्या जागा अधिक असल्याचं नमूद करत त्यांनी, “काही लोक म्हणत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे. पण या निकालांनी स्पष्ट केलं आहे की शिवसेना चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचली आहे,” असा दावा केला.


लाडक्या बहिणी-लाडक्या भावांचे आभार

“लाडक्या बहिणी-लाडक्या भावांचे आभार मानतो. छोट्या शहरांमध्येही शिवसेनेचा धनुष्यबाण पोहोचला असून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो,” असंही शिंदे म्हणाले. तसेच भाजपला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं.


ठाकरे गटावर टीका

यावेळी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर टीका करत शिंदे म्हणाले, “जे लोक घरी बसून राजकारण करतात, त्यांना मतदारांनी घरीच बसवलं आहे. खरी शिवसेना कोणाची हे जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.”

दरम्यान, आतापर्यंतच्या निकालांनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४०, काँग्रेसला ३४, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ७, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेला ८ जागांवर विजय मिळाला आहे.

Tags:    

Similar News