Shiv Sena शिवसेनेच्या इतिहासातील एक महत्त्वाची आणि ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या Neela Desai नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री (१६ जानेवारी २०२६) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्यानंतर काही तासांतच ही दुःखद बातमी समोर आली, ज्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
कोण होत्या नीला देसाई ?
नीला देसाई यांनी १९९० च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग अत्यंत कमी होता, त्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना संधी दिली. या संधीचे सोने करत नीला देसाई यांनी पक्षासाठी अथक परिश्रम केले.
शिवसेनेच्या 'रणरागिणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीला देसाई या आक्रमक, अभ्यासू आणि कर्तबगार नेत्या होत्या. त्यांनी पक्षाच्या सुरुवातीच्या काळापासूनच सक्रिय सहभाग घेतला आणि महिलांच्या राजकीय सहभागाला प्रोत्साहन दिले. त्या विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही कार्यरत होत्या.
मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात असलेल्या निराशेच्या वातावरणात नीला देसाई यांच्या निधनाने दुहेरी धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटासह संपूर्ण शिवसेना परिवार, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. नीला देसाई यांच्या निधनाने शिवसेनेच्या महिला शक्तीचा एक महत्त्वाचा स्तंभ गमावला आहे.