मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी शड्डू ठोकला असताना भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने आता गुजराती कार्ड बाहेर काढलं आहे.'मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धव ठाकरे आपडा, गुजराती भाषेत साद घालत शिवसेना संघटक हेमराज भाई शाह यांच्या नेतृत्वात गुजराती बांधवांचा येत्या 10 जानेवारीला तारखेला खास मेळावा आयोजित केला आहे. सेनेच्या या गुजराती पँटर्नला भाजप काय उत्तर देते याकडे आता लक्ष लागले आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने मोठ आव्हान निर्माण केल्यानंतर काही दिवस शिवसेना देखील मैदानात उतरली आहे. या बाबत बोलताना हेमराज शहा, म्हणाले फेब्रुवारी २०२२ मधे होणारी मुंबई सह दहा महानगरपालिकांची निवडणूक अत्यंत वेगळ्या परिस्थितीत होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या हातातील सत्ता भाजपच्या हटवादी गुजराती नेतृत्वामुळे आणि मराठी नेतृत्वला संधी न देण्याच्या संकुचित मनोवृत्तिमुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरावून घेतली असल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत.
त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी आपली मी मुंबईकर ही प्रतिमा जपत अत्यंत साधेपणाने महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव जपत उत्कृष्ट काम करत संकटावर मात करत मुंबई महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यात यश मिळवले. हे न पहावल्यामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत आणि मुंबई महापालिकेवरचा भगवा झेंडा खाली खेचण्याच्या वल्गना करीत आहेत.
शिवसेनेच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी मुंबई मधील गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला आहे. मुंबई मधील गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी रविवार दि. १० जानेवारी २०२१ सकाळी १० वाजतांनवनीत हॉल. गुजराती समाज भवन, लोटस पेट्रोल पंप समोर, ओशिवरा जोगेश्वरी लिंक रोड, जोगेश्वरी(पश्चिम) येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
कोरोना संकटाच्या वातावरणात सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या शंभर लोकांना सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. या परिसरातील शिवसैनिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी केले आहे. आता सेना नीतीला भाजप कसं उत्तर देतेय याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.