महादेव जानकर यांना कोणी दिला धक्का...

Update: 2019-10-07 13:55 GMT

"भाजपने मला धोका दिला आहे. आता कोणी धोका दिलाय हे मी सांगू शकत नाही पण धोका दिला आहे," अशी खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे.

महायुतीच्या जागा वाटपात दोन जागा रासपला दिल्या होत्या. मात्र राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर दोन्ही उमेदवारांनी रासपचे एबी फॉर्म न जोडता भाजपाचे फॉर्म जोडले. त्यामुळे जानकर भाजपवर आणि उमेदवारावर नाराज झाले आहेत.

जानकर म्हणाले ,"राहुल कुल यांनी ज्यादिवशी भाजपचा एबी फॉर्म जोडला त्यादिवशीच ते आमच्या पार्टीतून आउट झाले. त्यांचा, बोर्डीकरांचा पक्षाशी काही संबंध नाही. मला धोका दिला आहे एवढं नक्की. "

नेमका कोणी धोका दिला? असं विचारता ‘ते सांगू शकत नाही मात्र धोका दिला.’असं ते म्हणाले. महादेव जानकर नेहमी म्हणायचे, ‘भाजपच्या महालाशेजारी माझी झोपडी आहे.’

भाजपशी युती करूनही त्यांनी त्यांच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवत आमचा उमेदवार आमच्या चिन्हावर लढेल अशी भूमिका घेतली होती. विधानपरिषद निवडणुकीतही त्यांनी भाजपचा आग्रह होत असतानाही स्वतः रासपकडून फॉर्म भरला होता. आता मात्र त्यांना भाजपने एकही जागा सोडली नाही. सोडलेल्या जागांवरचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत.

Similar News