मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजप-शिवसेनेत पोस्टर वॉर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्या आधी शिवसेना आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर सुरू झालेले आहे
औरंगाबाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबाद मध्ये १६८० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन होणार आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात पूर्वीच भाजप शिवसेनेमध्ये या योजनेवरून राजकारण रंगले असून दोन्ही पक्षांकडून पोस्टर वॉर सुरू होत असल्याचे पाहायला मिळाले. ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.
तर दुसरीकडे ही योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केल्याचा दावा शिवसेना सुद्धा करत आहे. एवढेच नाही तर मुंबई-पुण्यात रंगणारे पोस्टर वॉर आता औरंगाबादमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे हे आज पाणी पुरवठा योजनेच उद्घाटन करणार असून, प्रशासनाकडून तगडी तयारी करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी 'योजना आम्हीच मंजूर करून आणली', असे पोस्टर शिवसेनेने भाजप आमदार अतुल सावेच्या बजरंग चौकातील कार्यालयाजवळ लावले होते. तर भाजपने 'योजनेचे श्रेय आमचेच' असे सांगणारे पोस्टर शहरातील बळीराम पाटील शाळेजवळ लावले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेवरून भाजप-शिवसेनेत वाद टोकाला पोहचला असल्याचं यातून दिसून येते.