आजपासून पावसाळी अधिवेशन, घटलेल्या संख्याबळानंतरही विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरणार

अजित पवार यांच्या बंडानंतर विरोधी पक्षाचे संख्याबळ घटले आहे. त्यापार्श्वभुमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकार पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनाला सामोरे जात आहे.

Update: 2023-07-17 03:09 GMT

राज्यविधीमंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन आजापासून सुरु होणार आहे. या अधिवेशनापुर्वीच अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागाने विरोधी पक्षाची ताकद कमी झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर हे अधिवेशन होत आहे. मात्र विरोधी पक्षाची ताकद कमी झाली तरी विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी रणनिती आखली आहे.

राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, सोयाबीन आणि कापूस खरेदी, दुबार पेरणीचे संकट, पावसाने दिलेली ओढ, याबरोबरच मित्तल टॉवरमध्ये बसून महसूलमंत्री व्हॉट्सअपवर अधिकाऱ्यांच्या बदल्या करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. त्यामुळे या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरणार आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाने संख्याबळ नसल्याने आत्मविश्वास गमावल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

त्याबरोबरच या अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षाचा आवाज डावलून कामकाज रेटून नेले जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

फडणवीस यांचीही विरोधी पक्षावर टीका

विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकण्याचे पत्र दिले. त्यामध्ये त्यांनी ते पत्र नाही तर ग्रंथच दिल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फर्निचर घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचे म्हटले. त्यामुळे विरोधी पक्षाने केलेल्या आरोपातील एक मुद्दा कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेसोबत इतर महापालिकांचीही चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्ष करण्याची शक्यता आहे.

बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येणार आहे.

Tags:    

Similar News