मोदी तुम्ही भारताचे पंतप्रधान की गुजरातचे? काँग्रेसचा मोदींवर ट्विटहल्ला

Update: 2019-04-17 11:42 GMT

कॉंग्रेसच्या हल्ल्यानंतर मोदींना झाली उपरती

काँग्रेसने ट्विटच्या माध्यमातून मोदींना पंतप्रधान पदाची जाणीव करून दिली आहे. मोदींनी एका विशिष्ट राज्याचे पंतप्रधान असल्यासारखे वागून पक्षपातीपणा करू नये आणि देशाचे पंतप्रधान असल्यासारखे वर्तन करावे, असे ट्विट करत कॉंग्रेसने मोदींना सुनावले आहे.

अवकाळी पाऊस आणि वादळाच्या तडाख्यामुळे मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मोदींनी ट्विटद्वारे गुजरातमध्ये अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल दु:ख व्यक्त केले. परिस्थितीवर यंत्रणांचे बारीक लक्ष आहे आपत्तीग्रस्तांना सर्व आवश्यक मदत केली जाईल, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच गुजरातमधील मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी दोन लाख रुपयांची मदतही जाहीर केली.

यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ काय म्हणाले ?

मोदी तुम्ही फक्त गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात.मध्य प्रदेशातही अवकाळी पाऊस आणि वादळात १० लोकांचा मृत्यू झाला आहे.

पण तुमच्या संवेदना फक्त गुजरातपुरत्याच मर्यादीत आहेत. मध्य प्रदेशात आता तुमच्या पक्षाचे सरकार नसेलही पण लोक इथे सुद्धा रहातात, असा टोला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी लगावला आहे.

त्यानंतर मोदींनी आपली चूक सावरत राजस्थान, मध्य प्रदेश आणि मणिपूरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दलही दु:ख व्यक्त केले व मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तर जखमींना ५० हजाराची मदत जाहीर केली आहे.

Similar News