शिवसेना इन ऍक्शन

Update: 2019-11-24 06:29 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार समर्थक आमदारांची कुठे लपू आणि कुठे नको अशी स्थिती झालीय. जे आमदार अजित पवारांच्या संपर्कात होते आणि विमानाने अज्ञात स्थळी जायला निघाले होते त्यांचं तिकीटचं काही क्षणात शरद पवारांकडे पोहोचलं. संजय बनसोड नावाचे आमदार मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये लपून बसले होते. ते ही कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पोहोचले. या सगळ्या नाट्यमय घडामोडींमागे पुन्हा एकदा शिवसेना आणि शिवसेनेचं मुंबईतलं तगडं नेटवर्क चर्चेचा विषय झाला आहे.

विमानतळ आणि मुंबईच्या सर्वच पंचतारांकित हॉटेल्समध्ये शिवसेनेची कामगार युनियन आहे. ही युनियन शिवसेनेसाठी गुप्तहेरांसारखं ही काम करते. त्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या पंचतारांकीत घडामोडीं मातोश्रीवर सातत्याने कळत असतात. पंचतारांकीत हॉटेलमधील रूम सर्विस पासून रिसेप्शन पर्यंत आणि काही ठिकाणी मॅनेजमेंट मध्येही शिवसेनेशी संबंधित कर्मचारी आहेत. शिवसेनेने अनेक मराठी मुला-मुलींना या क्षेत्रात नोकऱ्या दिल्या आहेत. त्याचप्रमाणे विमानतळांच्या ग्राऊंड स्टाफ मध्येही शिवसेनेशी संबंधित कर्मचारी आहेत. हेच नेटवर्क आता शिवसेनेला कामाला येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना रेनेसाँ हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिथे ही या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी शिवसेनेवरच आहे. काँग्रेसच्या आमदारांना ज्या जेडब्ल्यू हॉलेमध्ये ठेवण्यात आले आहे तिथे ही शिवसेनेचं नेटवर्क कामाला लागलं आहे. सहार हॉटेल मध्ये लपलेले संजय बनसोड यांना शिवसेनेने अक्षरशः उचलून आणून शरद पवारांच्या ताब्यात पोहोचवलं आहे. शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयाबाहेरही काल मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची गर्दी होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षांच्या कार्यालयाबाहेरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

Similar News