प्रदेश कॉंग्रेसमध्ये खांदेपालट अटळ : विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचा अखेर राजीनामा

Update: 2021-02-04 12:15 GMT

राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोलेंनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळांकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले प्रदेश कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष होणार असून विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय आधिवेशनात विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे.

कॉंग्रेस अंतर्गत खांदेपालटाची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नेमणुक झाल्यापासून याबाबत चर्चा होती. महसुलमंत्री आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मध्यंतरी दिल्ली दौरे करुन याबाबतची औपचारीकता पूर्ण केली होती. त्यामुळे आजच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी केली आहे. आगामी अर्थसंकल्पीय आधिवेशनात नव्या अध्यक्षाची निवड होणार असून जर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्ष पदासाठी कोण? हा सवाल आता उपस्थित होत आहे.

जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा असल्याची सुत्रांची माहीती आहे.काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचा विषय महिनाभरापासून रखडल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी होती. महाराष्ट्र प्रभारी एचके पाटील यांनी या बदलासाठी निवडलेल्या कार्यपद्धतीबद्दलही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी खाजगीत बोलताना नापसंती दर्शवली आहे. तीन जानेवारीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दिल्लीत आले होते. पक्षश्रेष्ठींना राज्यात बदल करायचा असल्यास आपण स्वतःहून राजीनामा देण्यास तयार आहोत असे त्यावेळी थोरातांनी म्हटलं होतं.

त्यानंतर राज्यात बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती.दुसर्‍या तिसर्‍या दिवशीच प्रभारी एचके पाटील यांनी मुंबईत पोहोचून मंत्री आणि आमदारांची मत जाणून घेतली होती. या सगळ्या चर्चेत नाना पटोले, राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांची नावं प्रदेशाध्यक्षपदासाठी विचारात होती. हायकमांडचा कल नाना पटोले यांच्या बाजूने असला तरी राज्यात अनेक मंत्री सरकारच्या स्थिरतेसाठी तूर्तास विधानसभा अध्यक्ष बदलण्याच्या विरोधात होते. तरीही दिल्लीतून नाना पटोले यांच्या नावावरच निश्चिती झाल्यानंतर चर्चेवर पडदा पडला आहे.

Tags:    

Similar News