येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत मोठे विधान, कर्नाटक भाजपमधील मतभेद उघड

कर्नाटकमध्ये भाजपमधील पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मोठे विधान केले आहे.

Update: 2021-06-06 14:34 GMT

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या एकाधिकारशाहीविरोधात नाराजी असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याऐवजी त्यांचे पुत्रच सरकार चालवत असल्याची तक्रार काही नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केल्याची चर्चा असताना येडियुरप्पा यांनी मोठे विधान केले आहे. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या कार्यशैलीविरोधात परिवहन मंत्री सी.पी. योगीश्वर यांच्यासह काही आमदार आणि नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तर भाजपचे आमदार बासवनगौडा पाटील यांनीही येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती. पाटील हे येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय विजयेंद्र यांचे कट्टर विरोधक आहेत. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना पक्षांतर्गत मतभेदांवर थेट भाष्य केले. पक्ष नेतृत्वाने आदेश दिला तर आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, तसेच पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी अनेक पात्र नेते आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. पण आपल्याच सरकारविरोधात जाहीरपणे बोलणाऱ्यांबाबतही पक्ष नेतृत्व योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान यासंदर्भात कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कतील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येडियुरप्पा हे सच्चे भाजप कार्यकर्ते आहेत म्हणूनच त्यांनी पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करेन असे म्हटले आहे, असे नलीन कुमार यांनी म्हटले आहे. पण पक्षात कोणतेही मतभेद नसून राज्यात मुख्यमंत्री बदलाची कोणतीही शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:    

Similar News