विक्रमगडमध्ये प्रस्थापितांना धक्का देत जिजाऊ संघटनेची मुसंडी

Update: 2022-01-20 06:45 GMT

मिनी विधानसभा म्हणून ज्या निवडणुकांकडे पाहिले जाते, त्या राज्यातील बहुचर्चित नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात सर्वच राजकीय पक्षांची आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राज्यभरात राष्ट्रवादी, भाजपाची सरशी होत असताना पालघर जिल्ह्यात मात्र सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना बाजूला करत निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेने मुसंडी मारली आहे.

17 जागा असणाऱ्या विक्रमगड नगरपंचायतीमध्ये निलेश सांबरे यांच्या विक्रमगड विकास आघाडी विरोधात सर्वच राजकीय पक्ष आणि नेते एकवटले होते. पण विरोधकांना धोबीपछाड देत श्रमजीवी संघटनेच्या मदतीने विक्रमगड विकास आघाडीने सर्वाधिक 16 जागा जिंकत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याचबरोबर तलासरी आणि मोखाडा नगरपंचायतीमध्ये 2-2 जागा जिंकत जिजाऊ संघटनेने दमदार इंट्री केली आहे. त्यामुळे तलासरी आणि मोखाडयाच्या विकासाचाही मार्ग आता मोकळा झाला आहे.

राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेची पालघर जिल्ह्यासह राज्यात झालेली पिछेहाट चिंताजनक आहे. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व विक्रमगड मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांना त्यांच्याच होमग्राउंडवर विक्रमगड, तलासरीमध्ये भोपळाही न फोडता आला नाही. तर मोखाड्यात केवळ चार जागा जिंकता आल्याने राष्ट्रवादीला जिल्ह्यात लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने गेल्या 12 -13 वर्षापासून ठाणे- पालघर जिल्ह्यात आणि कोकणात काम करत आहे.

Tags:    

Similar News