धक्कादायक : मुंबईतून दररोज 16 मुली आणि महिला होत आहेत बेपत्ता

Update: 2023-03-11 07:12 GMT

महिला दिनाला दोन दिवसही उलटले नाहीत तोच मुंबईतून दररोज 16 मुली व महिला बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेत चौथ्या आधुनिक महिला धोरणावर चर्चा झाली. त्यामध्ये अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या. मात्र एकीकडे ही चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतून दररोज जवळपास 16 मुली व महिला बेपत्ता होत असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत 1 हजार 330 अल्पवयीन मुली आणि 4 हजार 437 महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 18 वर्षाखालील 614 मुली आणि 18 वर्षावरील 370 महिला बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. त्यामुळे वर्षभरात मुंबईत 6 हजार 133 महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांपैकी 1 हजार 97 अल्पवयीन मुली आणि 3 हजार 39 महिला सापडल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर दितांना दिली.

महिला अत्याचार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना

मुंबई परिमंडळात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी SOP तयार करण्यात आलेली आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

मुंबईतील अपर पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक नियंत्रण कक्षास मिसिंग डेस्क कार्यान्वित करण्यात आला आहे.

बेपत्ता मुले, मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान ही विशेष मोहिम राबवण्यात आली आहे.

Tags:    

Similar News