वाढवणमध्ये आढळला 'फ्लाईंग फिश'

Update: 2020-12-09 14:26 GMT

पालघर : जिल्ह्यातील वाढवण येथे एका मच्छीमारीच्या जाळ्यात एक फ्लाईंग फिश मासा आढळला आहे. अशा प्रकारचा मासा डहाणू व पालघरमध्ये आढळल्याची नोंद यापूर्वी झालेली नसून प्रथमच असा मासा सापडल्याने या माशाबाबत कुतूहल निर्माण झाले असून सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

काय आहे फ्लाईंग फिश?

पाण्याच्या पृष्ठाभागावररुन काही फूटांपर्यंत उडू शकणारा एक सागरी मासा म्हणजे 'फ्लाईंग फिश'. जगभरात या माश्याच्या ९ प्रजाती व ६४ जाती असून सर्व उष्ण प्रदेशातील समुद्रात ते आढळून येतात. त्यांचे वक्षपर विस्तीर्ण व पडद्यांनी बनलेले असून ते पंखांप्रमाणे काम करतात. हे मासे त्यांच्या बळकट शेपटीला रेटा देऊन पाण्याच्या पृष्ठभागावर उसळी मारून बाहेर झेप घेतात आणि परांच्या साहाय्याने काही अंतर हवेत तरंगत अंतर पार करतात. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे त्यांना पाखरू मासा असे देखील म्हटले जाते. मात्र ते पक्षांप्रमाणे उडू शकत नाहीत. कोकण किनारपट्टीवर आढळणाऱ्या पाखरू माशाचे शास्त्रीय नाव 'एक्झॉसीटस व्होलिटॅन्स' असे आहे.


एक्झॉसिटिडी कुळातील माशांचे शरीर १५–४५ सेंमी लांब व दोन्ही टोकांना निमुळते असते. त्यांचे पृष्ठपर व गुदपर शेपटीच्या अगदी जवळ असतात. वक्षपर विस्तृत व पातळ पडद्यांचे बनलेले असतात. काळपट रंगाच्या या वक्षपरांवर काही जातींमध्ये ठळक काळे ठिपके असतात. शरीरावर मध्यम आकाराचे चमकते चंदेरी खवले असतात. मुख वर वळलेले असते, डोळे मोठे असतात व वाताशय मोठा असतो. अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागरात हे मासे प्रामुख्याने आढळतात. खोल समुद्रात हे मासे आढळत असून किना-यावर ते क्वचितच पाहायला मिळतात.

शत्रूपासून बचाव करताना किंवा भक्ष्याचा पाठलाग करताना पाखरू मासे पाण्याबाहेर येऊन तरंगतात. पाण्याबाहेर येण्यापूर्वी ते पोहण्याचा वेग अतिशय वाढवतात आणि उसळी घेऊन शरीर पाण्याबाहेर काढतात व वक्षपर पसरतात. ते पुच्छपराने दोन्ही बाजूंच्या पाण्याला फटकारे देत नागमोडी मार्गाने पुढे सरकतात आणि शेपटीला रेटा देऊन हवेत पूर्णपणे झेपावतात. ते पाण्यातून उसळी घेण्यापूर्वी शरीर काही सेकंद हलवून गती प्राप्त करतात. एका उड्डाणात ते साधारणपणे ५०–४०० मीटर एवढे अंतर सहज कापतात. त्यांचे उड्डाण विमानासारखे असून उडताना त्यांचे पर वर-खाली होत नाहीत. ते तासाला ७० किमी.वेगाने उडू शकतात आणि पाण्याच्या पृष्ठभागापासून सु. ६ मी. उंच तरंगू शकतात. पाण्यात परत शिरताना वक्षपर मिटले जातात किंवा शेपटीने पाण्यावर झटका देत पुन्हा तरंगण्यासाठी गती प्राप्त करतात.

Tags:    

Similar News