शिवसेनेला धक्का, वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम पाडले बंद

Update: 2021-10-30 13:49 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे. मच्छिमारांची एकही मागणी मान्य न करता मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे. कोस्टल रोड प्राधिकरणाने परस्पर समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छिमारांना मासेमारी करण्यात अडथळे येत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या बार्जेस समुद्रात नांगरून ठेवल्याने मच्छिमारांच्या जाळ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मच्छिमारांनी आतापर्यंत संयमी भूमिका घेतली होती, परंतु आता प्राधिकरणाच्या हुकूमशाही पद्धतीच्या कामकाजाला आळा घालण्यासाठी आणि प्रशासनाला अद्दल घडविण्यासाठी तीव्र भूमिका घेतल्याचे या मच्छिमारांनी सांगितले आहे. जृपर्यंत मच्छिमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत कोस्टल रोडचे काम सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका मच्छिमारांनी घेतली आहे.



 


आदित्य ठाकरे यांना सवाल

वरळी हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. परळला आग लागली तिकडे आदित्य ठाकरे गेले पण वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते का येत नाहीत, असा सवाल या मच्छिमार बांधवांनी उपस्थित केला आहे.

मासेमारीसाठी जाण्यासाठी समुद्रातील मार्गात असलेल्या दोन पिलरच्या मधील अंतर २०० मीटर ठेवण्याची मागणी स्थानिक मच्छिमारांनी केली आहे. पण प्राधिकारणाने त्याचे अंतर ६० मीटर ठेवल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. दरम्यान मच्छिमारांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे वरळी कोळीवाड्यात वातावरण चिघळले आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स आणि आरसीएफ तैनात करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News