आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार राज्यपाल नियुक्त आमदार आणि शेतकरी पॅकेजवर शिक्कामोर्तब

तब्बल दोन आठवड्याच्या खंडानंतर आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार असून प्रलंबित १२ राज्यपालांची नियुक्ती आणि राज्याच्या आर्थिक आढाव्याबरोबरच अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेंजबाबत निर्णय होणार आहेत.

Update: 2020-10-29 03:00 GMT

कोरोना महामारीचा कमी झालेला प्रादुर्भाव, अतिवृष्टीनं घेतलेली उसंत आणि एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीप्रवेशानं झालेल्या राजकीय भुकंपानंतर तब्बल दोन आठवड्याच्या खंडानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. गेली अनेक दिवस प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त रिक्त आमदारांच्या नेमणुकीच्या शिफारसीचा महत्वपूर्ण निर्णय आज होणार आहे. राज्याच्या बिकट आर्थिक परीस्थितीच्या पार्श्वभुमिवर वित्त विभागाच्या वतीने राज्य मंत्रिमंडळापुढे सादरीकरण होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या अतिवृष्टी पॅकेजला राज्य मंत्रिमंडळाची देखील आज मंजूरी घेतली जाणार आहे.

जीएसटीच्या माध्यमातून राज्याल ३८ हजार कोटी केंद्राकडून येणे बाकी आहे. कोरोना संकटात राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारला कर्ज काढावं लागले.कोरोना सुरु झाल्यापासून राज्याच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुख्य खर्च राज्य सरकारने कर्ज काढून भागवला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला, त्यात राज्यावर तेव्हा एकूण संचित कर्जं आणि इतर देणी ही 4,71,642 कोटी रुपये आहेत असं सांगितलं गेलं आहे. त्यामुळे अतिरीक्त निधीची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारला पुन्हा कर्ज उभारावे लागणार आहे.

यातच विधानपरिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना लवकरच मुहूर्त लागण्याची चिन्हं आहेत. तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसेंसह आदेश बांदेकर, आशिष देशमुख, वरुण सरदेसाई, सत्यजीत तांबे, सचिन सावंत, सचिन अहिर अशा 17 जणांच्या नावांची चर्चा आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर उद्या ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती आहे. जून महिन्यापासून या जागा रिक्त असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या लांबल्या होत्या. कोणाकोणाची नावं चर्चेत?

शिवसेना

सुनील शिंदे – वरळीचे माजी आमदार, आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडली

आदेश बांदेकर – शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्रिपद दर्जा), 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर माहिममधून पराभव

सचिन अहिर – 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जातो, त्याची बक्षिसी म्हणून विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता

शिवाजीराव आढळराव-पाटील – सलग तीन वेळा शिरुरचे खासदार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले नेते डॉ. अमोल कोल्हेंकडून पराभव, आमदारकीतून राजकीय पुनर्वसन होण्याची चिन्हं

वरुण सरदेसाई – युवासेना सरचिटणीस

राहुल कनाल – युवासेना पदाधिकारी

वरुण सरदेसाई यांच्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचे म्हटले जाते

राष्ट्रवादी

एकनाथ खडसे – भाजपचा राजीनामा देत नुकतेच राष्ट्रवादीत आगमन, राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित

शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे हे शरद पवार यांच्या मर्जीतील मानले जातात

आदिती नलावडे – मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख, माजी विधानसभा अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दिवंगत दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी, सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय

सूरज चव्हाण – राष्ट्रवादी पदाधिकारी

राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते

आनंद शिंदे – प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी निश्चित मानली जाते

काँग्रेस

सचिन सावंत – काँग्रेस प्रवक्ते

आशिष देशमुख – नागपूरमधील काटोलचे माजी आमदार, भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश

नसीम खान – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री

मोहन जोशी – माजी विधानपरिषद आमदार, 2019 मध्ये पुण्यातून भाजप नेते गिरीश बापट यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत पराभव

सत्यजीत तांबे – महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांसाठी निकष काय?

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता आमदार नियुक्तीवरुन राज्यपाल काय भुमिका घेताहेत हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News