#AndhraPradesh : कोरोनाचे सर्व नियम तोडत हजारो सरकारी कर्मचारी रस्त्यावर

Update: 2022-02-04 05:29 GMT

आंध्र प्रदेशमध्ये हजारोंच्या संख्येने सरकारी कर्मचारी आणि शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. आंध्र प्रदेशात शिक्षक आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी वेतन सुधारणा लागू कऱण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण वेतन सुधारणेला शिक्षकांनी विरोध केला आहे. याविरोधात आपला रोष व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील शिक्षक रस्त्यावर उतरले आहे. सरकारने लागू केलेले कोरोनाचे सर्व निर्बंध झुगारुन विजयवाडाकडे शिक्षकांचा मोर्चा निघला आहे. त्यामुळे विजयवाडामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक जमा झाले आहेत.


गेल्या काही वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आंदोलनात सहभागी झाल्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे सांगितले जाते आहे. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या रेल्वे भरती परीक्षेविरोधातल्या आंदोलनानंतर हे आणखी एक मोठे आंदोलन आहे. पण सध्या तरी हे आंदोलन शांततेत सुरू आहे.


 चलो विजयवाडा अशी घोषणा देत हजारो शिक्षक यामध्ये सहभागी झाले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या वायएसआर काँग्रेसने यामागे राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे. पण आंदोलक कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी हा आरोप फेटाळला आहे. हा एक ऐतिहासिक संघर्ष आहे. आमच्यासोबत लाखो कर्मचारी आहेत. एवढेच नाही तर पोलिसांचाही आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा वेतन सुधारणा विरोधी समितीच्या नेत्यांनी केला आहे. तसेच सरकारने वेतन सुधारणा धोरण मागे न घेतल्यास ७ फेब्रुवारीपासून बेमुदत संप करण्याचा इशाराही कर्मचारी संघटनेने दिला आहे. एवढेच नाही तर वीज कर्मचारी आणि परिवहन विभागाचे कर्मचाऱ्यांचा देखील या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा दावा या समितीच्या नेत्यांनी केला आहे. राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या वेतन सुधारणेला विरोध केला आहे, कारण यामुळे पगार कमी झाल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

Similar News