...अन् कणखर अजित पवारांना अश्रू अनावर

Update: 2019-09-28 12:37 GMT

आपल्या कणखर शैलीसाठी प्रसिद्ध असणारे नेते अजित पवार (Ajit Pawar Resigns) यांचा एक भावनिक पैलू आज पहायला मिळाला. आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या तब्बल २० तासांनंतर अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार (Sharad Pawar} यांचा संबंध नसताना आपल्यामुळे विनाकारण त्यांचं या प्रकरणात नाव आलं म्हणून आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलत असतांना त्यांना अश्रू अनावर झाले.

शिखर बँक प्रकरणात (Shikhar Bank Scam) ७० हून अधिक लोकांची नावं आहेत. त्यात भाजप-सेनेच्या नेत्यांचाही समावेश आहे. मग असं असताना फक्त माझ्यावरच आरोप का? नेमकं निवडणुकांच्या तोंडावरच घोटाळ्याचे आरोप कसे होतात असा सवाल करत सततच्या आरोपांमुळे मन उद्विग्न झालं असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली. शेवटी मलाही मन आहे, मलाही भावना आहेत असं सांगत असताना त्यांना हुंदका अनावर झाला.

अजित पवार आपल्या कणखर कार्यशैली आणि रांगड्या स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांची अशा स्वरुपाची वक्तृत्वशैली प्रसिद्ध आहे. परंतू शरद पवार आणि स्वतःवर होत असलेल्या सततच्या आरोपांमुळे ते भावनिक झाल्याचं निमित्ताने पहायला मिळालं.

Similar News