गोसेखुर्द प्रकल्पाच्या 33 दरवाज्यांपैकी 19 दरवाजे उघडले

गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या 33 पैकी 19 दरवाजे उघडण्यात आले. यंदा पावसामुळे अशी परिस्थिती दोन वेळा आल्याची माहिती गोसेखुर्द प्रशासनाने दिली आहे.

Update: 2021-07-23 08:02 GMT

 मागील तीन दिवसांपासून विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्याठिकाणी नदी, नाले दुथडीभरून वाहत आहेत, अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोसेखुर्द प्रकल्पाच्या 33 दरवाज्यांपैकी 19 दरवाजे उघडण्यात आलेत. कालपासून पूर्व आणि पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस बरसतोय.आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे आणखी काही दरवाजे उघडले जातील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 3 दरवाजे उडण्यात आले.त्यानंतर सकाळी 8 वाजता 7 तर सकाळी 10 वाजता 12 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत गोसेखुर्द प्रकल्पाच्या 33 पैकी 19 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

पाणलोट क्षेत्रात 9 जिल्ह्यांत जोरदार पाऊस

गोसेखुर्दच्या पाणलोट क्षेत्रात 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. यात भंडारा, गोंदिया, नागपूर , मध्यप्रदेशातील मंडला, बालघाट, शिवणी, बैतुल, छिंदवाडा व छत्तीसगडच्या राजनांदगावचा समावेश आहे. तीन्ही राज्यात जोरदार पाऊस होत असल्याने गोसेखुर्द प्रकल्प भरला आहे. यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे गोसेखुर्द प्रकल्प प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Tags:    

Similar News