राज ठाकरेंच्या लाव रे...ची दहशत ऐका या ऑडिओ क्लिपमध्ये...

Update: 2019-05-02 18:46 GMT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभरात सभा घेतल्या. या सभांमधून राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ही टीका नुसती शाब्दिक नव्हती तर केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचे पुराव्यानिशी धिंडवडेच राज यांनी व्हिडीओ क्लिप, वर्तमानपत्राची कात्रणं दाखवून आणि प्रत्यक्ष लाभार्थी किंवा पीडितांनाच व्यासपीठावर बोलावून सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. त्यात देशातलं पहिल डिजीटल गाव म्हणून धिंडोरा पिटलेल्या हरिसाल (जि. अमरावती) च्या मी लाभार्थी जाहिरातीतल्या मनोहर खडके यालाच (१५ एप्रिल) व्यासपीठावर आणलं होतं. त्यानंतर भाजपनं हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी (२२ एप्रिल) फेसबुक लाईव्ह करत गावात डिजीटल सुविधांविषयी माहिती सांगत राज ठाकरेंचा दावा खोडून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे ?

या ऑडिओ क्लिपमध्ये भाजप-शिवसेनेच्या दोन नेत्यांचं संभाषण आहे. मतदानाच्या अनुषंगानं बुथ वरील यंत्रणेला वाटण्याच्या पैशासंदर्भात या दोन नेत्यांमध्ये संवाद सुरू होतो. यामध्ये भाजपसाठी बोलणारी व्यक्ती म्हणते, ‘त्या राज ठाकरेनी तो हरिसालचा मुलगा दाखवला सभेमध्ये, त्यासाठी आम्हांला दोन दिवस घालवावे लागले’ त्यानंतर दुसऱ्या बाजूनं बोलणारी व्यक्ती म्हणते, मुकुंद कुलकर्णींना अप्पाचा नंबर कुणी दिला, फॉलोअप कुणी करायला लावला एकदा विचारा...यानंतर हा संवाद संपतो...

राज ठाकरेंना प्रत्युत्तर द्यायला भाजपला ७ दिवस का लागले ?

आता मुद्दा असा उपस्थित होतो की, १५ एप्रिलला राज ठाकरेंनी हरिसालच्या मनोहर खडकेंना व्यासपीठावर आणून डिजीटल गावाची पोलखोल केली होती. त्यानंतर दोन दिवस भाजपच्या नेत्यांना हरिसालमध्ये तळ ठोकून तिथलं नेटवर्क दुरूस्त करून घ्यावं लागल्याचं दिसतंय. कारण जर हरिसालमध्ये डिजीटल सुविधा असत्या तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिलला हरिसालच्या उपसरपंच किंवा भाजपकडून राज ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलं असतं मात्र तब्बल ७ दिवसानंतर हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं. यातूनच राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडीओची किती दहशत राजकीय वर्तुळात उमटली होती, याचा अंदाज समजण्यासाठी ही ऑडिओ क्लिप प्रतिनिधीक स्वरूप आहे. मॅक्स महाराष्ट्रनंही हरिसालचे उपसरपंच येवले हे स्वतः फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसल्याचं दाखवलं होतं, शिवाय हरिसाल गावाचं फेसबुक पेजही सक्रिय नसल्याचं दिसलेलं आहे. त्यामुळं हरिसाल हे देशातलं पहिलं संपूर्णतः डिजीटल गाव हा सरकारचा दावाच यामुळं फोल ठरतोय.

या ऑडिओ क्लिपनंतर एका नेटिझन्सची प्रतिक्रिया

ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यामुळं या ऑडिओ क्लिपच्या विश्वासार्हतेची जबाबदारी मॅक्स महाराष्ट्र घेत नाही. शिवाय मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही या ऑडिओ क्लिपशी संबंधित वार्तांकन केलेलं आहे.

Full View

 

Similar News