पुलवामा हल्ल्याची पूर्वकल्पना दिली होती – राज ठाकरे

Update: 2019-04-23 16:33 GMT

जम्मू-काश्मीरमध्ये झालेला पुलवामा इथला दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजित होता. ज्या रस्त्यावर हा हल्ला झाला तो रस्ता आधी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वच्छ करून घ्या आणि मगच सीआरपीएफच्या जवानांना तिथून न्या, अशा स्पष्ट सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिल्या होत्या, मात्र तरीही जवानांचा ताफा त्याच रस्त्यावरून नेण्यात आला असल्याचं सांगत राज यांनी पुलवामा हल्ल्याकडे केंद्र सरकारनं जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा थेट आरोपच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलाय.

गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष

मोदी सरकार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर देशात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील, हे आपण २०१५ मध्येच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, याचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी केलाय. तोच धागा पकडत राज यांनी पुलवामा हल्ल्यापूर्वीची महत्त्वाची कागदपत्रंच यावेळी दाखवली. पुलवामाचा दहशतवादी हल्ला होण्याच्या बरोबर आठ दिवसांपूर्वीच म्हणजे ८ फेब्रुवारी २०१९ रोजी गुप्तचर यंत्रणांनी सीआरपीएफसह केंद्राचं गृहमंत्रालय, जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा यंत्रणांना अशा हल्ल्यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले होते. ती नोटीसच राज ठाकरेंनी यावेळी दाखवली. या नोटीसीमध्ये ज्या रस्त्यावरून सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जाणार होता तो रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वच्छ करण्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. त्याच नोटीसमध्ये दहशतवाद्यांकडून याच रस्त्यावर सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांचा वापर करून मोठा स्फोट घडविण्याचा इशाराही स्पष्टपणे देण्यात आला होता. मात्र, तरीही त्याकडे गृहमंत्रालय आणि सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय.

१४ फेब्रुवारीला पुलवामा इथं दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याचं म्हटलं होतं. याचाही पुनरूच्चार राज ठाकरेंनी यावेळी केला आहे.

जवानांना विमानं, हेलिकॉप्टर का दिलं नाही ?

जम्मू – काश्मीरमधली सर्व शक्यता लक्षात घेता सीआरपीएफच्या जवानांना प्रवासासाठी विमानं किंवा हेलिकॉप्टर देण्यात यावं, अशी मागणी सीआरपीएफ आणि बीएसएफच्यावतीनं करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडेही दुर्लक्ष झाल्यानं आपल्याला ४० जवान गमावावे लागले, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Full View

Similar News