लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ३००चा आकडा पार केला आहे.अमित शहांना या विजयाचं शिल्पकार म्हणून पाहिलं जातं.अमित शाह यांना महत्त्वाचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून पक्ष संघटनाची जबाबदारी इतर कोणत्यातरी नेत्याला देण्यात येईल. यामध्ये सर्वात आघाडीवर धर्मेंद्र प्रधान आणि जे पी नड्डा यांच्या नावाची चर्चा आहे. दोघांपैकी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अभुतपूर्व यश मिळाले आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा पाच लाखांच्या बहुमताने विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांना महत्त्वाचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहांना गृहखातं किंवा अर्थमंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शहांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय. मात्र अमित शहांना मंत्रिपद मिळाले तर पक्ष संघटनाची जबाबदारी कोण सांभाळणार हा प्रश्न भाजपाला पडला आहे. यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि वरिष्ठ नेते जे. पी. नड्डा यांचे नाव चर्चेत आहे.